Ind vs Eng 3rd Test: लॉर्डसवर झालेल्या तिसऱ्या कसोटीत (India vs England 3rd Test) आपल्याला बोचणाऱ्या पराभवाची ही दोन वाक्यातली कहाणी. आपल्या समोरचं आव्हान १९२ इतकं माफक होतं. जबरदस्त फॉर्मात असलेली आपली फलंदाजीची फळी.... त्यात गिल, जैस्वाल, पंत, राहुल चौघेही धावांचा रतीब घालतायत. असं असताना आपण दुसऱ्या डावात ८२ ला सात असं कोसळलो. चौथ्या दिवशी खेळपट्टी रंग दाखवू लागलेली हे मान्य. अगदी इंग्लंडच्या फलंदाजांना त्यांच्याच भूमीवर बॅटिंग करताना आपण नाकात दम आणलेला. तरीदेखील पाचवा अख्खा दिवस शिल्लक असताना आपण हा स्कोअर गाठू शकलो नाही. आपला पराभव जरी पाचव्या दिवशी झाला असला तरी त्याचं बी चौथ्या दिवशी आपणच पेरलं. म्हणजे ते जैस्वालच्या अवसानघातकी फटक्याने पेरलं. त्याची आक्रमक शैली, त्याचं सातत्य, त्याचं कसोटीतलं बॅटिंग अॅव्हरेज हे सगळं एकीकडे आणि त्याने परवा आर्चरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मारलेला बेफिकीर फटका दुसरीकडे. अवघ्या २० च्या आसपास ओव्हर्स खेळून काढायच्या होत्या. त्यात टार्गेट होतं १९३ चं. समोर सातत्यपूर्ण फलंदाजी करत बर्फाची लादी डोक्यावर ठेवून बॅटिंग करणारा राहुल. असं असताना जैस्वालने इंग्लंड संघात कमबॅक कऱणाऱ्या आर्चरला वेलकम बॅक म्हणत विकेट गिफ्ट दिली.
बहुदा तिथेच इंग्लंडला एक लय सापडली. पुढे करुण नायरने सेट झाल्यानंतर जिथे चेंडू सातत्याने मूव्ह होऊ लागलेला, अशा खेळपट्टीवर स्टम्पवर येणारा चेंडू सोडून दिला. म्हणजे तो चेंडू किती मूव्ह होईल, याचं चेंडूचं जजमेंटच त्याला आलं नाही. तिथेच घात झाला. या दोन विकेट्सनी इंग्लंडचा आत्मविश्वास गगनचुंबी टॉवरएवढा वाढला. तिथून पुढे त्यांनी सामन्यावरची ग्रिप अजिबात सोडली नाही. पहिल्या कसोटीप्रमाणेच साडेतीन-चार दिवस सामन्यावर असलेली आपली पकड ढिली झाली आणि ३-० किंवा २-१ अशी आघाडी घेऊ शकणारे आपण १-२ अशा पिछाडीवर पडलो. आपल्या आघाडीच्या फलंदाजांना आणखी चांगला खेळ करता आला असता. रोहित, विराटनंतर आपली फलंदाजी संक्रमणावस्थेतून जातेय हे मान्य. अशाच अनुभवांमधून आपण शिकतो हेही मान्य. तरीही विनिंग पोझिशनमधून या दोन्ही मॅचेस आपण घालवल्या. हे जास्त मनाला लागलंय. खास करुन या तिसऱ्या मॅचचा पराभव जास्त जिव्हारी लागलाय. जडेजासाठीही खूप वाईट वाटतंय. त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये जे टेम्परामेंट दाखवलं त्याला तोड नाही. ज्या खेळपट्टीवर चेंडू मध्येच फणा काढत होता तर काही वेळा थोडा खालीदेखील राहत होता. तिथे जडेजा मात्र प्रचंड एकाग्रतेने, जिद्दीने बॅटिंग करत होता.
'विकेट देणार नाही, हिंमत असेल तर काढून दाखवा असं जणू चॅलेंज देत होता. त्याच्याचपासून प्रेरणा घेऊन जिथे बुमरा १०४ मिनिटं तर सिराज ६४ मिनिटं उभं राहण्याचा संयम दाखवू शकले. तिथे आपले जैस्वालसारखे आघाडीवीर उतावीळ फटके मारून आऊट झाले. तसंच दुसऱ्या डावात आपल्या गोलंदाजीवेळी २५ बाईज, ६ लेग बाईज आणि १ नो बॉल अशी अवांतर धावांची संख्या होती ३२ च्या घरात. आपला पराभव झाला तो २२ धावांनी. याहीकडे लक्ष द्यावं लागेल. अगदी पहिल्या डावातही ११ बाईज, १३ लेग बाईज, २ नो बॉल आणि ५ वाईड बॉल अशा ३१ अवांतर धावांची खैरात आपण केली. म्हणजे दोन्ही डावांत मिळून ६३ धावा आपण प्रतिस्पर्धी संघाला गिफ्ट केल्यासारख्याच आहेत. इंग्लंडसारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याविरोधात तेही त्यांच्याच भूमीत त्यांच्याशी दोन हात करताना आपल्याला हा न मागता दिलेला आहेर पुढच्या दोन मॅचेसमध्ये आवरता घ्यावा लागेल.
आपली युवा टीम चांगली फाईट देतेय, त्यात जडेजासारख्या अनुभवी प्रतिभावान अष्टपैलूंचीही साथ लाभतेय. असं असताना फिनिशिंग टचच्या वेळी आपण मागे पडतोय. तर, दुसरीकडे सामन्याच्या चार-साडेचार दिवस पिछाडीवर राहूनही इंग्लंडने निर्णायक तासांमध्ये असा काही खेळ केला की, खिशातून हात घालून एखाद्याने आपले पैसे हिसकावून घ्यावेत तसा इंग्लंडने दोन्ही सामन्यात, खास करुन ल़ॉर्डसवर आपला विजय हिसकावून घेतला. हा पराभव जसा क्रिकेटचाहत्यांच्या मनाला लागलाय तसाच तो टीममधील खेळाडूंच्याही मनात सलत असणार हे नक्की. पुढचं मैदान मँचेस्टरचं आहे. बुमरा न खेळल्यास कदाचित अर्शदीप संघात येईल. अन्य बदलांची शक्यता कमी वाटते. आपण, फलंदाजीवर जास्त विश्वास दाखवलाच तर, नितीशच्या जागी चायनामन एक कुलदीप यादव टीममध्ये येऊ शकतो.अन्यथा तीच टीम राहील. अजूनही आपण मालिका जिंकू शकतो, हा विश्वास क्रिकेटरसिक म्हणून या पराभवानंतरही आम्हाला वाटतोय. तो या गिलच्या भारतीय टीमलाही वाटत असावा, अशी अपेक्षा आहे.