Never Give Up, Nothing is Impossible असे अनेक मोटीवेशनल कोट्स आपण रोज सोशल मीडियावर वाचत असतो. अशाच संदर्भाच्या स्टोरीज, मूव्हीजही आपण आवडीनं पाहतो. पण आपल्या क्रिकेट कारकिर्दीतून Never Give Up चा मेसेज दिलाय तो खेळाडू दिनेश कार्तिक यानं...आपल्या सर्वांच्या लाडक्या डीकेनं आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले... मग ते ऑन फिल्ड असो किंवा ऑफ फिल्ड.. धोनीच्या दमदार खेळीमुळे संघातून आपोआप बाहेर पडणं किंवा पत्नीचं आपल्याच मित्राबरोबर अफेअर...अशा मोठ्या संकटातूनही सावरला आणि जगाला दाखवून दिलं कि हो स्वप्न पूर्ण होतात...त्याच दिनेश कार्तिकबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ...


तर नुकताच बीसीसीआयनं आगामी टी20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला... यावेळी युवा खेळाडूंची फौज घेऊन नवखा कर्णधार रोहित आणि उपकर्णधार केएल राहुल मैदानात उतरणार आहे... या संघात सर्वात अनुभवी आणि सर्वात वयस्कर म्हटलं तर यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक... 2004 म्हणजे जवळपास 18 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या डिकेनं आता विश्वचषकाच्या संघात एन्ट्री मिळवून सर्वांनाच हैराण केलंय..पण हा कोणता चमत्कार नसून त्यानं त्याच्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यानं हे साध्य करुन दाखवलंय. 


तर कार्तिकचं संपूर्ण नाव कृष्णकुमार दिनेश कार्तिक... 1 जून 1985 रोजी तत्कालीन मद्रास अर्थात चेन्नईमध्ये एका तेलगू परिवारात त्याचा जन्म झाला. 10 वर्षाचा असल्यापासून क्रिकेट खेळणाऱ्या कार्तिक लहाणपणी जवळपास दोन वर्षे कुवेतमध्ये राहिला. वडिलांची नोकरी तिथे असल्यामुळे त्याला काही वर्षे तिथे शिक्षण घ्यावं लागलं. त्यानंतर आठवीपासून पुन्हा चेन्नईमध्ये त्याने पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. वडिलही चेन्नईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळल्यामुळं पठ्ठ्याच्या रक्तातच क्रिकेट होतं, मग काय वडिलांच्या कोचिंगखाली क्रिकेट खेळायला सुरुवात केली. फलंदाजीत निपुण असणाऱ्या कार्तिकनं नंतर विकेटकिपिंग शिकली आणि 1999 साली तामिळनाडूच्या 14 वर्षांखालील संघात जागा  मिळवली. मग काय 2000-2001 च्या दरम्यान त्याने 19 वर्षाखालील संघातही मिळवली. मग फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत त्याने काही वर्षातच भारतीय संघात जागा मिळवली. 2004 साली एकदिवसीय आणि कसोटी संघात जागा मिळवत दिनेशनं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. 


अगदी वंडर फॉर्म नसला तरी दिलेली जबाबदारी योग्यपणे पार पाडण्याची ताकद कार्तिकमध्ये होती. त्यात विकेट्समागे अगदी चपळ असल्यानं एक परफेक्ट विकेटकिपर तो होताच... त्यामुळे 2006 साली भारतीय संघ सर्वात पहिला टी20 सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला असताना, त्या संघाचा भाग होता दिनेश कार्तिक. पण पुढे महेंद्रसिंह धोनी नावाचं वादळ आलं आणि पार्थिव पटेल, रिद्धिमान साहा आणि सोबतच दिनेश कार्तिकसारख्या युवा विकेटकिपर्सची संघातील जागाही गेली. तेव्हापासून दिनेश कधी संघाच्या आत कधी बाहेर असाच दिसून येत होता. त्यातच 2007 साली निकीता वंजारासोबत लग्नबंधनात अडकलेल्या कार्तिकची मॅरीड लाईफ काय खास ठरली नाही. त्याचाच मित्र आणि सोबती क्रिकेटर मुरली विजय सोबत दिनेशच्या पत्नीचं अफेअर होतं. त्यामुळे दिनेश आणि ती 2012 साली वेगळे झाले. त्यानंतर कार्तिकनं भारतीय स्कॅश प्लेअर दिपीका पल्लीकलसोबत 2013 मध्ये लग्न केलं आणि आता त्या दोघांचा सुखी संसार चालू आहे.. नुकतंच 2021 मध्ये त्यांनी जुळ्या मुलांना जन्मदेखील दिला.


आता लग्नाची गाडी रुळावर आली असली तरी क्रिकेटमध्ये मात्र अजून हवा तसा फॉर्म गवसत नव्हता. 2021 मध्ये तर दिनेशनं अचानक केकेआरचं कर्णधारपद सोडलं आणि सर्वांना तो निवृत्ती घेतो की काय असं वाटू लागलं... पण माघार घेईल तो दिनेश कार्तिक कसला... कार्तिकनं  IPL 2022 मध्ये रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाकडून अशी काही चमकदार कामगिरी करून दाखवली कि बंगळुरूचा फुलटाईम फिनिशर म्हणून त्याला ओळखू जाऊ लागलं. 2022 आयपीएलमध्ये त्यानं 15 सामन्यात कार्तिकनं 10 वेळा नाबाद राहात 324 धावांचा पाऊस पाडला हंगामात सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या कार्तिकनं याच जोरावर भारतीय संघातही स्थान मिळवलं. अलीकडच्या काही दौऱ्यांमध्ये पुन्हा कार्तिकनं फिनिशरची भूमिका हवी तशी पार पाडत आता आगामी विश्वचषकाच्या संघातही स्थान मिळवलं आहे... दरम्यानच्या काळात संघात ये-जा करणाऱ्या दिनेशनं बऱ्याच सामन्यात आपली छाप नक्कीच सोडली होती. त्यातील एक सामना म्हणजे 2018  सालचा निदहास ट्रॉफीचा अंतिम सामना (nidahas trophy 2018 final)  भारत विरुद्ध बांग्लादेश या फायनलच्या सामन्यात शेवटच्याा बॉलवर 5 रनांची गरज होती तिकडे बांग्लादेशचे फॅन्स नागीन डान्स करु लागले होते, आणि तेव्हाच कार्तिकनं धडाकेबाज असा षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला आणि कार्तिकमे अभी क्रिकेट बाकी है हे दाखवून दिलं. अशा बऱ्याच सामन्यात यशस्वी कॅमिओ करणाऱ्या कार्तिकनं आज विश्वचषकाच्या संघात जागा मिळवत काहीच अशक्य नसतं हे दाखवून दिलं आहे.