सध्या कोरोनाच्या या रोगट वातावरणात नव नवीन गोष्टीची भर पडत असून विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या परावर्तित स्वरूपातील डेल्टा प्लस प्रकारांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यात या डेल्टा प्लस कोरोनाच्या या विषाणूच्या प्रकारामुळे एका महिलेचा शुक्रवारी (25 जून ) मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे. सध्या राज्यात या विषाणूच्या प्रकारामुळे बाधित झालेले 20 रुग्ण राज्यातील विविध भागात उपचार घेत आहेत. यापूर्वी राज्यात कोरोना विषाणूच्या परावर्तित स्वरूपातील प्रकार आढळले होते. त्याचप्रमाणे डेल्टा प्लस अनेक देशात आढळून आला आहे. मुळात या सर्व प्रकारात कोरोनाच्या अनुषंगाने जे नियम आखून दिले आहेत त्याचे पालन केले तर कोणत्याही संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही हे तज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे.
नागरिकांनी विषाणूचा प्रकार न बघता कोणताही विषाणू हा घातकच आहे असे समजून त्याच्यापासून सुरक्षित अंतर कसे ठेवता येईल याचाच विचार केला पाहिजे. कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असताना राज्य सरकारने राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, परिणामी मोठ्या प्रमाणात यामुळे संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी टाळणे, आंदोलने, एकत्रित जमण्यावर आणि 'सुपरस्प्रेडर' यांच्यावर राज्य सरकारने कठोर बंधने आणण्याची गरज आहे. डेल्टा प्लस हा विषाणूचा प्रकार गंभीर तर आहेच. मात्र, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात जी गर्दी होत आहे ती धोकादायक आहे. त्यामुळे संसर्गाचा फैलाव अधिक प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्या एका महिलेचा मृत्यू रत्नागिरी झाला आहे त्या महिलेला या विषाणूच्या संसर्गाबरोबर सहव्याधी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या विषाणूच्या प्रकारामुळे बाधित झालेल्या सर्व 20 रुग्णांवर उपचार सुरु असून सर्वांची तब्बेत व्यवस्थित आहे. या नवीन विषाणूच्या प्रकारांच्या संसर्गाने बाधित रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करायचे यावर डॉक्टर काम करीत आहेत. डेल्टा प्लस रुग्णांची लक्षणे ही सर्वसाधारण कोरोनाची लक्षणे असतात त्याप्रमाणेच असतात. या विषाणूचा प्रादुर्भाव किती गंभीर आहे, याबाबत अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने मात्र हा विषाणूंचा चिंताजनक प्रकार असल्याचे म्हटले आहे.
या विषाणूचा फैलाव किती राहील हे आताच सांगणे मुश्किल आहे. ह्या नवीन विषाणूचे वर्तन कसे असेल याबाबत आता कुणीच काही सांगू शकत नाही. विषाणूचे परावर्तित होणे म्हणजे नेमके काय होते हे जाणून घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय तज्ञांचे मते, हे यापूर्वीच्या साथीच्या आजारात दिसून आले आहे कि, प्रत्येक विषाणूं हा आपले अस्तित्व टिकवून ठेवत असतो. याकरिता तो स्वतःच्या रूपामध्ये बदल करून घेत असतो. कोरोनाच्या या काळातच ब्राझील स्ट्रेन, यु के स्ट्रेन, दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन बघितले आहे. भविष्यात असे आणखी विषाणूचे प्रकार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विषाणूचे बदल होत जाणे ही एक प्रक्रिया आहे आणि याचे ज्ञान वैद्यकीय जगताला अवगत आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. 15 मे पासून 7500 नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 केसेस आढळून आले आहेत, त्यापैकी एक रुग्ण नुकताच दगावला आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना आपल्याकडे निर्बंध शिथिल करण्यात आले आणि त्यामुळे बाजारपेठांमध्ये नियमित होणारी गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्याशिवाय निवडणुकीच्या सभा, आंदोलने-मोर्चे, लग्न आणि धार्मिक सोहळे मोठया प्रमाणात आयोजित करण्यात आले आणि ह्या सर्व गोष्टी दुसऱ्या लाटेकरीता कारणीभूत ठरल्या होत्या. त्यामुळे आता दुसऱ्या लाटेनंतर आपण काही शिकणार आहोत कि नाही. सध्याची परिस्थिती पाहता रस्त्यांवर विविध कारणामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. यामुळे भविष्यात मोठे धोके संभवतात. सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून तज्ञांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
याप्रकरणी, मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे सांगतात की, "डेल्टा प्लस हा नवीन विषाणूचा प्रकार घातक असला तरी कोरोनाचे सर्व सुरक्षिततेचे नियम पाळले तर त्यापासून नागरिक दूर राहू शकतात. त्याशिवाय ह्या नवीन विषाणूच्या प्रकाराला घेऊन लसीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असले तरी या म्हणण्यावर तात्काळ भाष्य करणे योग्य नाही कारण यासाठीच अधिकचा अभ्यास होणे गरजेचा आहे आणि त्यावर आपल्याकडे सध्या काम सुरु आहे. सध्या तरी सर्व पात्र नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. डेल्टा प्लस पेक्षा अधिक धोका हा विनाकारण जी गर्दी जमत आहे त्यापासून आहे ती गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
तर राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, "डेल्टा प्लस विषाणूने बाधित रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे आणि ते सध्या होत आहेत. मात्र, गर्दीमुळे किंवा सुपर स्प्रेडर कार्यक्रमांमुळे संसर्गाचा फैलाव वाढून जर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? पुन्हा एकदा निर्बंध आणावे लागतील. विनाकारण गर्दी टाळता कशी येईल यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या गर्दीच्या प्रकारांमुळे मोठे धोके संभवतात.
मे 31, ला' निर्बंध शिथिल.... येरे माझ्या मागल्या नको नको!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, लॉकडाउन मधील निर्बंधांवरील शिथिलता मिळणार का? हा प्रश्न सध्या काही जणांना छळत असला तरी ही शिथिलता अर्थचक्र हळूहळू रुळावर येण्यासाठी देण्यात आली आहे, त्याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये. विनाकारण बाहेर जाणे टाळणे ही काळाची गरज आहे. जितकी गर्दी कमी तितका आजाराच्या संसर्गाचा फैलाव कमी होणार आहे. कोरोनाचा धोका टळलेला नाही, फक्त रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. राज्यात रोज रुग्ण बरे होऊन जाण्याचे प्रमाण चांगले असले तरी हजारोच्या संख्येने नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी होत असले तरी मृत्यूच्या प्रमाणाचा आकडा अजूनही लक्षणीय आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी ग्रामीण भागात अजूनही त्याचे प्रमाण आहे. अनेक गावं आजही ओस पडली आहेत. गावातले घर सोडून नागरिकांनी शेताकडे धाव घेतली आहे. एकंदरच कोरोनाची परिस्थिती भयावह आहे आणि ती आणखी कठीण होऊन द्यायची नसेल तर ती काळजी नागरिकांनाच घ्यावी लागेल. पहिली लाट, दुसरी लाट किंवा येऊ घातलेली तिसरी लाट मोजत बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत सुरक्षित कसे राहता येईल नागरिकांनी केला पाहिजे. जानेवारी महिन्यात परिस्थिती चांगली होती. हळूहळू सगळ्या गोष्टी खुल्या करण्यात आल्या त्याचा परिणाम गेल्या तीन महिन्यापासून आपण सर्वच पाहत आहोत. यावेळी मात्र तशी चूक न करता भलेही शासनाने काही ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता दिली असेल. मात्र, ती हलक्यात घ्यायची नाही. आजपर्यंत जगण्याच्या या लढाईत स्वतःला सुरक्षित ठेवले त्याचप्रमाणे अजून काही काळ ठेवावे लागणार आहे. हा कोरोनाचा व्हायरस आहे हा असा अचानक नाहीसा होणार नाही. वैद्यकीय शास्त्राच्या आधारावरच त्याचा समूळ नायनाट करावा लागणार आहे. त्यामुळे वैद्यक शास्त्रातील तज्ञ ज्याप्रमाणे सांगत आहे तसे वागा, जीवापेक्षा कुठलीही गोष्ट मोठी नाही, लक्षात ठेवून सुरक्षित वावर ठेवला पाहिजे.
कोणत्याही कारणाने होणारी गर्दी ही भविष्यातील मोठ्या संसर्गाच्या फैलावाची नांदी ठरू शकते हे विसरून चालणार नाही. दुसऱ्या लाटेतील होणारे नागरिकांचे आणि व्यवस्थेचे हाल सगळ्यांनीच पहिले आहे. या सगळ्या प्रकारातून जर आपण बोध घेणार नसू तर कोरोनाचा विषाणू आणखी काही मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचे बळी घेतल्याशिवाय रहाणार नाही. आंदोलन, सभा, धार्मिक सोहळे आणि राजकारण होत राहील. मात्र, या भूतलावरचा मनुष्य पहिला या आजारांपासून सुरक्षित होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा आणि स्वस्थ राहा.