मुंबई : रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आणि दररोज नवा उचांक गाठला जात आहे.  लॉकडाऊनची चर्चा गेली अनेक दिवस राज्यात सुरु आहे. कारण मंत्री मंडळातील काही सदस्यांनी याबाबत आपले मत व्यक्त करून इशारेवजा संकेत यापूर्वीच दिले होते. मात्र त्यानंतर काही राजकीय पुढाऱ्यांनी लॉकडाऊनमुळे लहान उद्योगधंदयांना मोठ्या प्रमाणात झळ बसेल आणि कामगार-मजूर वर्गाचे हाल होऊ शकते, असं सुचवून या संभाव्य लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. त्यानंतर लॉकडाऊन न करता कठोर निर्बंध करण्याबाबत एक सूर आळविण्यात आला. अनेक वेळा गर्भित इशारे देऊनही रस्त्यांवरील गर्दी काही कमी होत नाही. अनेक जण तर सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून आपले दैनंदिन व्यवहार करत आहेत. परंतु रुग्णसंख्या इतकी वाढली आहे की काही दिवस रुग्णसंख्या अशीच वाढत  राहिली तर परिस्थिती हाताबाहेर निघून जाईल हे सांगण्यासाठी आता कुण्या तज्ञांची गरज नाही. सध्याच्या घडीला राज्यातील प्रमुख शहरात ऑक्सिजनयुक्त बेड्स वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर धावपळ सुरु आहे. औषधसाठा योग्य प्रमाणात हवा म्हणून नियोजन केले जात आहे. कुशल मनुष्यबळाची कमतरता भासू नये म्हणून कंत्राटी भरती प्रक्रियेने वेग घेतला आहे. राज्यातील आरोग्य परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे आता अनाठायी गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू ठेवून अति प्रभावित शहर आणि जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन करण्याबाबत शासन अनुकूल असल्यास आश्चर्य वाटायला नको, याबाबत कधीही घोषणा होऊ शकते. मात्र ही घोषणा करता तळागाळातील घटकांचा शासन नक्कीच विचार करेल हाच काय तो गेल्या वर्षीच्या आणि आता होऊ घातलेल्या मिनी लॉकडाऊन मधील फरक असणार आहे.


राज्यातील काही शहरांमधील पॉजिटिव्हिटी रेट १८ टक्क्यापासून ते ३२ टक्क्यांपर्यंत गेला आहे. वातावरण भयावह असं झालं आहे. रुग्णव्यवस्थेवर मोठा ताण आहे. अनेक नागरिक पुणे, औरंगाबाद आणि मुंबई शहरात आपल्या रुग्णास रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या वाट्याला रुग्णालयातील बेड येईल असे नाही. अनेकांची रवानगी कोविड केअर सेंटर मध्ये करण्यात येत आहे. व्हेंटिलेटर मुबलक प्रमाणात उपलब्ध राहतील  आणि ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित राहिला यासाठी प्रशासन विशेष नियोजन करीत आहे. लॉकडाऊन जसा सामान्य नागरिकांना नको आहे तसाच  शासनालाही नकोय कारण यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची भिती आहे. महसुलाला मोठ्या प्रमाणात कात्री तर लागतेच, त्याशिवाय लहान व्यवसाय करणाऱ्यांना या काळात त्याच्या रोजच्या धंद्यात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. मात्र काही वेळा झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध आणण्याशिवाय पर्याय नसतो. कारण त्यामुळे गर्दी आटोक्यात येते, वर्दळीवर, वाहतुकीवर  नियंत्रण मिळवणं शक्य होतं. त्याचा साहजिकच संसर्ग कमी होण्यास मदत होते.  मुद्दा आहे तो आता हे कठोर निर्बंध कशा पद्धतीने असतील याचा, ज्या ठिकाणची गर्दी सहजपणे टाळली जाऊ शकते अशा ठिकाणावर प्रथम कडक निर्बंध सरकार आणू शकते. अत्यावश्यक सेवांना कुठेही बाधा न आणता या उर्वरित गोष्टी कशा बंद करता येतील याकडे प्रशासन विशेष लक्ष देऊ शकते. शासनासाठी नागरिकांचे आरोग्य चांगलं असणं ही प्राथमिकता असते, काही जणांचा या विचाराला विरोध असू शकतो. त्यांचे मते रोजगार महत्त्वाचा आहे, प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते.                


१ एप्रिलला राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधितांची जी आकडेवारी जाहीर केली होती त्यानुसार एकाच दिवसात, ४३ हजार १८३ नवीन रुग्णाचे निदान करण्यात आले होते, तर २४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याच दिवशी ३२ हाजरी ६४१ रुग्ण घरी बरे होऊन गेले होते. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी मृत्यू दर नियंत्रित ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मात्र त्याचवेळी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात जी वाढ झाली आहे ती कमी कशी करता येईल हीच चिंता सध्या प्रशासनाला सतावत आहे. लॉकडाऊनच्या बातम्या आल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चलबिचल पाहायला मिळत आहे, काही जण किराणा सामान भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत. ज्या ठिकाणी अंशत लॉकडाऊन सुरु झाला आहे त्या नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणं अपेक्षित आहे. गेल्या वेळी लॉकडाऊन केला होता तेव्हा परिस्थिती वेगळी होती. यावेळी आपल्याकडे या आजाराच्या विरोधातील लस उपलब्ध आहे. लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन या आजारांपासून संरक्षण मिळविले पाहिजे.          


महाराष्ट्रातच कोरोना का वाढतो ? हा प्रश्न खूप लोकांना पडलेला आहे. बाकीच्या राज्यात सर्व काही सुरळीत  सुरु आहे, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवडणुका सुरु आहेत. सभा, मोर्चाना गर्दी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. मग तिकडे कोरोनाचा प्रसार होत नाही आणि राज्यातच कोरोना का वाढतो असा प्रश्न सर्व सामान्यांना पडणे रास्त आहे. लोक कसेही वागतात या केवळ एकाच मुद्द्यांवर साथीचे आजार वेगाने पसरतात या एकाच विषयांवर अनेकवेळा बोलले जाते. मात्र विषाणूचे बदल स्वरूप , साथीच्या संसर्गाचे स्वरूप ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आपल्या राज्यात या विषाणूचे दोन नवीन स्ट्रेन सापडले आहे ते केवळ आपल्याच राज्यातच सापडले हे लक्षात घ्यायला हवे. ह्या स्ट्रेनचा आणि वाढत्या कोरोना संसर्गाचा काही संबध आहे का यावर अधिक अभ्यास होणे गरजेचं आहे तो आपल्याकडे झालेला नाही. कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होत असतात तो शास्त्राचा भाग असे अनेक वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ सांगत असतात. या अशा विषाणूच्या जनुकीय बदलांमुळे रुग्णसंख्या वाढते किंवा कमी होत असते. 


छगन भुजबळ अॅक्शन मोडवर, गलथान कारभारावरुन नाशिकमध्ये अधिकाऱ्यांना झापले, सिव्हिल सर्जन सक्तीच्या रजेवर


आजपर्यंत कोरोनाबाबत अनेक लोकांनी विविध भविष्य वर्तविले मात्र त्याचे वर्तन आजतागायत कुणीही सांगू शकलेले नाही. कारण कोरोनाचा आजार आपल्या सर्वांसाठीच नवीन आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेनं तो यावेळी सौम्य आहे. कारण रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तर मोठ्या प्रमाणात लक्षणविरहित रुग्ण सापडत आहे, विशेष म्हणजे मृत्यूदर अजूनही कमी ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलेले आहे. साहजिकच रुग्ण संख्या वाढत असताना सुरक्षिततेचे जे नियम आखून दिले आहे त्याचा वापर सगळ्यांनीच करणे गरजेचं आहे. कोरोनाच्या साथीच्या अभ्यासावर मोठे काम होणे बाकी आहे, एका देशात साथ रोखण्याकरिता जो उपाय फायदेशीर ठरला आहे तो उपाय दुसऱ्या देशात फायदेशीर ठरेलच असे नाही. तेथील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे आणि अन्य देशातील वेगळी आहे, त्यात दोन देशामध्ये असलेलं तापमान ही वेगळं असतं. साथीच्या काळात या नव-नवीन प्रतिबंधात्मक उपाय योजना करून पाहायच्या असतात. कधी कशात यश मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आजारावर लक्षणानुसार औषध डॉक्टर प्रथम देतात, नंतर जर रुग्ण त्या औषधांना प्रतिसाद देत नाही, असं आढळलं तर औषध बदलतात, यातूनच यशस्वी उपचार पद्धती विकसित होत असते.         


सध्या लोकांना कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येपेक्षा लॉकडाऊन होणार का यांची चिंता भेडसावत आहे. या नागरिकांच्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत त्यातून मिळू शकते. सगळ्याचे लक्ष  मुख्यमंत्री संध्याकाळी काय जाहीर करणार याकडे लागून राहिले आहे. ते यावेळी राज्यातील कोरोनबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही कठोर निर्बंध राज्यात लावू शकत असल्याची शक्यता वर्तवली जातेय. खासगी कार्यालयात ज्यांना शक्य आहे त्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश, धार्मिक स्थळं काही काळापुरती बंद होण्याची शक्यता, मॉल, थिएटर, नाट्यगृहे काही दिवसांकरिता बंद ठेण्याचे आदेश ते देऊ शकतात. तसेच विशेष म्हणजे लोकल ट्रेनच्या वापरावर निर्बंध आणले जाऊ शकतात.  दिवसातील काही काळामध्ये काही तासांची  संचारबंदी आण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या सगळ्या शक्यता असल्या तरी  याचा कमी अधिक प्रमाणात वापर काही शहरात आणि जिल्ह्यात सुरु करण्यात आला आहे.