नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभर वाढत चालला आहे. त्यात नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. असं असताना शासकीय अधिकारी बेफिकीर असल्याचं चित्र आहे. यावरुन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी सिव्हील सर्जन रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराबाबत भुजबळ संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं त्यांनी आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करत तातडीने रावखंडे यांच्यावर कारवाई केली. 


कालच्याच बैठकीत कोरोना प्रादुर्भाव वाढण्यात काही शासकीय अधिकारीही जबाबदार आणि बेफिकीर आहेत असं म्हणत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना समज दिली होती. आज ते म्हणाले की, नागरिकांनी बेफिकीरपणा दाखवला हे आहेच मात्र आमच्या अधिकाऱ्यांनी बेफिकीरपणा दाखवला. एक महिन्यापूर्वीच अधिक जोमाने कारवाया झाल्या असता तर फरक पडला असता. तीन दिवसांनी मी पुन्हा आढावा घेऊन आज दिलेल्या सूचनांचा आढावा घेणार आहे असं ते म्हणाले. 


 ही वेळ आराम करण्याची नाही- भुजबळ
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की,  सिव्हील सर्जन यांनी काल मीटिंगमध्ये योग्य उत्तरे दिली नाहीत.  दोन वेळा आधी त्यांना समज दिली होती. व्हेंटिलेटरची गरज पडत असतांना सिव्हीलमध्ये व्हेंटिलेटरची पडून आहेत. त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या. आरोग्य मंत्र्यांना आधीच त्यांच्याबाबत सांगितलं होतं.  शेवटी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे लागले, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, ही कारवाई बघून इतर अधिकाऱ्यांनी  समजून घ्यावं. सगळ्या अधिकाऱ्यांना कालच सांगितलंय कामं जबाबदारीने करा. ही वेळ आराम करण्याची नाही, असंही भुजबळ म्हणाले. 


भुजबळ म्हणाले की, आज मुख्यमंत्री बोलणार आहेत. त्यावर आपण विचार करा. नवीन काही करतात का बघू. एसटी बसेसवरही नियत्रंण ठेवणे गरजेच आहे. बसेसची 50 टक्के क्षमता करता येते का ते बघू, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, गुजरातमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांची टेस्ट बंधनकारक आहे.  आपल्याकडे राज्य पातळीवर हा निर्णय कसा होतो हे बघावे लागेल. गुजरातमध्ये मागे मोदी स्टेडियममध्ये गर्दी होती, मास्क नव्हते. इतर ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा होतात, असं देखील भुजबळांनी सांगितलं.