BLOG : साऊथच्या चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. बाहुबलीपासून सुरु झालेला हा प्रवास पुष्पा, केजीएफ 2 ते आता अगदी कार्तिकेय 2 पर्यंत सुरुच आहे. अत्यंत कमी खर्चात बनलेला आणि कोणतीही तगडी स्टारकास्ट नसलेला कार्तिकेय 2 चित्रपटही हिंदी प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतला. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील गल्ला दिवसेंदिवस वाढतच आहे. साऊथच्या या चित्रपटांपुढे हिंदीतील बड्या स्टार्सचे चित्रपट पटापट आपटू लागलेत. आमिर खानचा लाल सिंह चड्ढा बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम करेल असे म्हटले जात होते. पण पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाला जी ओहोटी लागली ती शेवटपर्यंत थांबलीच नाही. प्रेक्षक नसल्याने चित्रपटाचे खेळ रद्द करण्याची वेळ चित्रपटगृहांवर आली होती. आमिरच्या आतापर्यंतच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनाचा मोठा वीकेंड आमिर खानला मिळाला होता पण त्याचा काहीही फायदा त्याला झाली नाही. दुसरीकडे अक्षयकुमारचा रक्षाबंधन देखील बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यानंतर विजय देवरकोंडाचा करण जोहर निर्मित लायगर देखील बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप झाला.
त्यापूर्वी अक्षयकुमारचा पृथ्वीराज चौहान आणि रणबीर कपूरचा शमशेराही बॉक्स ऑफिसवर धाडकन आपटले. अनुराग कश्यपचा तापसी पन्नू अभिनीत दोबाराकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. या चित्रपटांच्या फ्लॉपमागे बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड कारणीभूत असल्याचे म्हटले गेले. पण यापूर्वीही आमिरच्या चित्रपटावर बॉयकॉट करण्याची घोषणा झाली होती मात्र ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले होते. चित्रपट चांगला असेल तर त्याच्यावर बॉयकॉटचा परिणाम होत नाही असे यापूर्वी दिसून आले आहे. त्यामुळे बॉयकॉटचा आणि चित्रपट फ्लॉप होण्याचा संबंध नाही असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. लाईगरच्या वेळेला विजय देवरकोंडाने माझा चित्रपट बिनधास्त बॉयकॉट करा असे म्हटले होते आणि त्याचे फळ त्याला मिळाले.
जी-7 मल्टीप्लेक्सचे मालक मनोज देसाई यांनी तर 800 प्रेक्षकांची क्षमता असलेले गॅलेक्सी चित्रपटगृह हिंदी चित्रपटाला प्रेक्षक येत नसल्याने बंद केले आणि आता तेथे दुरुस्तीचे काम हाती घेतले. विजय देवरकोंडावर त्यांनी चांगलीच टीका केली होती. कलाकारांचा अतिआत्मविश्वासच त्यांना बुडवतोय असे वक्तव्य त्यांनी केले. गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड संपतेय की काय असा प्रश्न सतत विचारला जात आहे.
पण आता बॉलिवूडचे सगळे लक्ष रणबीर कपूर, आलिया आणि अमिताभ बच्चन अभिनीत ‘ब्रह्मास्त्र’ आणि ऋतिक रोशन, सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’वर लागलेय. विक्रम वेधा हा साउथच्याच चित्रपटाची अधिकृत रिमेक आहे. हे दोन चित्रपट बॉलिवूडला तारतील असे म्हटले जात आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा यशराज फिल्म्सचा बहुचर्चित आणि 500 कोटींचा खर्च असलेला महागडा चित्रपट असल्याचे सांगितले जातेय. ‘ब्रह्मास्त्र’चे तीन भाग रिलीज केले जाणार आहेत. रणबीर कपूर यात शिवा नावाच्या युवकाची भूमिका साकारीत आहे तर आलिया भट्ट ईशाची भूमिका साकारत आहे. अमिताभ बच्चन रणबीर कपूरच्या गुरुच्या भूमिकेत दिसणार आहेत. साऊथ स्टार नागार्जुनही या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहे. तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेतही हा चित्रपट रिलीज केला जाणार असून याच्या प्रमोशनसाठी साऊथ स्टार्स आणि मोठ्या दिग्दर्शकांचीही मदत घेतली जात आहे. चित्रपटाचे व्हीएफएक्स हॉलिवूडच्या तोडीचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल असे बॉलिवूडकरांना वाटत आहे. केवळ बॉलिवूडच्या लोकांनाच नव्हे तर चित्रपटगृह मालकांनाही या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. ब्रह्मास्त्रवरही बॉयकॉटचं वादळ घोंघावतंय पण चित्रपट चांगला असल्यानं तो चालेल असे म्हटले जात आहे. 9 सप्टेंबरला हा चित्रपट देशात आणि परदेशात रिलीज केला जाणार आहे.
अशीच अपेक्षा ऋतिक आणि सैफच्या विक्रम वेधाकडूनही आहेत. हा चित्रपट आर. माधवन आणि विजय सेतुपती अभिनीत विक्रम वेधाची अधिकृत रिमेक आहे. आर. माधवनचा हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हिंदीमध्ये डब होऊन हा चित्रपट छोट्या पडद्यावरही दाखवण्यात आला. हिंदी बेल्टमधील प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडला होता. असे असतानाही रिलायन्सने याचा हिंदी रिमेक आणण्याचे धाडस दाखवले आहे. हे धाडस ऋतिक रोशनच्या लोकप्रियतेवर करण्यात आले आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. 30 सप्टेंबर रोजी रिलीज होणारा हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल करेल अशी अपेक्षा बॉलिवूडकरांना आहे.
30 सप्टेंबरलाच साऊथ स्टार विक्रम आणि ऐश्वर्या राय अभिनीत आणि मणिरत्नम दिग्दर्शित बहुचर्चित ‘पोन्नियन सेलवन भाग १’ ही रिलीज होणार आहे. चित्रपटाला संगीत ए. आर. रहमानने दिले आहे. हा चित्रपटही सुपरहिट होण्याची चिन्हे दिसत आहेत. जर तसे झाले तर साऊथचा आणखी एक चित्रपट बॉलिवूडवर राज्य करील. मात्र सध्या तरी बॉलिवूडकरांचे सगळे लक्ष ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘विक्रम वेधा’कडे लागले आहे. हे दोन चित्रपट बॉलिवूडला तारण्यात यशस्वी होतील का? या प्रश्नाचे उत्तर याच महिन्यात मिळेल.