प्रिय युवी,


आज ऑफिसला येता येताच तुझ्या क्रिकेट निवृत्तीची बातमी ऐकली आणि मन फ्लॅशबॅकमध्ये गेलं. हो, फ्लॅशबॅकमध्येच. कारण, गेल्या काही वर्षांमध्ये तुझं संघातलं स्थान पाहुण्या कलाकारासारखंच होतं. असं असलं तरीही एक जमाना होता, जेव्हा तू भारतीय क्रिकेटमधला खास करुन वनडेचा राजपुत्र होतास.

तुझी डावखुरी फलंदाजी समोरच्या गोलंदाजीला दास बनवून राज्य करायची. तुझे ड्राईव्हज, तुझी लीलया, षटकार ठोकण्याची क्षमता, सगळं अचंबित करणारं होतं. म्हणजे एका जमान्यात टेनिसस्टार रॉजर फेडरर इतक्या भन्नाट फॉर्ममध्ये होता की, असं वाटायचं. तो बायकोला सांगून निघत असावा, आलोच जरा एक ट्रॉफी जिंकून. तसा तू जणू पॅव्हेलियनमध्ये सांगून येत असावास, आलोच जरा गोलंदाजांची खांडोळी करुन. तू अनेकदा चेंडूला स्टेडियमच्या विविध भागांची मुक्त सफर घडवून आणलीस.

स्ट्युअर्ट ब्रॉडला तू टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये ठोकलेले सहा षटकार आठवले की, आजही अंगावर शहारे येतात. तू आणि धोनीने अनेक सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा फडशा पाडलेला आम्ही पाहिलाय. सात-आठ-नऊचं एव्हरेज तुम्ही एखाद्या हायवेवरुन स्पोर्टस कार आरामात पळवावी तशा स्पीडने कव्हर करायचात आणि विजय पताका फडकवायचात. तुझं रॉ टॅलेंट आणि धोनीचा कूलनेस यामुळे तुमचा खेळ एकमेकांना पूरक होता. त्या काळातले तुम्ही ग्रेट फिनिशर होतात.

तुझ्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण अर्थातच 2011 चा वर्ल्डकप असणार. ज्या स्पर्धेआधी तू सांगितलं होतंस, आय अॅम प्लेईंग फॉर समवन. ज्याचा उलगडा नंतर तूच केला होतास की, तू तुझ्या दैवतासाठी म्हणजे सचिनसाठी खेळत होतास. तुझी फलंदाजी आणि डावखुरी फिरकी गोलंदाजीही त्या स्पर्धेत भारतीय संघाची ताकद दुणावणारी ठरलेली. फायनलचा सामना जिंकल्यानंतर तुझे भरुन आलेले डोळे आजही समोर आले की, आमच्या पापण्या ओल्या होतात.

नॅटवेस्ट फायनलमधली तू कैफच्या साथीने केलेली खेळी किंवा लक्ष्मणसोबत ऑस्ट्रेलियन भूमीवर तू केलेली शतकी इनिंग असेल, अशा अनेक खेळींनी आज तू आमच्या आठवणींची शोकेस भरलीयेस.  ज्या सफाईने तू वनडेच्या मैदानात वावरलास, त्या सहजतेने तू कदाचित टेस्ट क्रिकेटमध्ये नाही स्थिरावू शकलास. तुझी फलंदाजी शैली, तुझं तंत्र कदाचित वनडेलाच जास्त सूट होणारं होतं. असं असलं तरी तू आणि सचिनने इंग्लंडविरुद्ध 2008 च्या चेन्नई टेस्टमध्ये गाजवलेला पराक्रम आजही लक्षात राहतो. 387 चं टार्गेट गाठताना सचिनचं शतक आणि तुझी 85 धावांची नाबाद खेळी याने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला.

पण, कसोटीतल्या तुझ्या खेळी या ट्रेलरसारख्या होत्या. पूर्ण पिक्चर फक्त वनडे क्रिकेटमध्येच दिसला. फलंदाजी, गोलंदाजीशिवाय तुझं क्षेत्ररक्षण हेही संघासाठी बलस्थान होतं. तुझे पॉईंट रिजनमध्ये पकडलेले झेल, तू चित्त्यागत झेपावून केलेले रनआऊट्स आजही जसेच्या तसे समोर येतात. तू वनडे संघासाठी एक कम्प्लिट पॅकेज होतास. पुढे कॅन्सरशी दोन हात करतानाही तुझी लढाऊ वृत्ती दिसली.

गेल्या काही वर्षात तू संघामधून आतबाहेर होतास. तरी त्याने तुझं मोठेपण कमी होत नाही. तो काळाचा महिमा होता, असंच म्हणावं लागेल. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली तू संघात एन्ट्री घेतलीस, धोनीच्या नेतृत्वाखालीही तू मैदान गाजवलंस. आज तुझी बॅट म्यान झाली आणि वनडेचं एक पर्व थांबल्याची जाणीव झाली. सिक्सर किंग युवीला आम्ही नेहमीच मिस करु.

तुझा चाहता,

अश्विन