गेले दोन ते तीन दिवस इंद्रायणीला (Indrayani River) आलेला वारकऱ्यांचा पूर हळूवारपणे ओसरला. आपल्याच धुंदीत हा पूर पुण्याच्या (Pune) दिशेने निघाला. रस्त्यांना जणू आज पांढऱ्या शुभ्र प्रवाही नदीचे स्वरूप आले होते. पहाटे लवकर माऊलींची (Sant Dnyaneshwar Palkhi) आरती झाल्यावर गांधीवाड्यातून माऊलींनी पुण्याकडे प्रस्थान ठेवले आणि खऱ्या अर्थाने आज माऊली आळंदीबाहेर (Alandi) पडल्या. प्रत्येक क्षण माऊलींबरोबर व्यतीत करणाऱ्या इथल्या प्रत्येक सजीव, निर्जीव गोष्टींना पुढील 15-20 दिवस माऊलींचा सहवास मिळणार नाही. 'अवस्था लावूनी गेला, अजुनी का न ये' म्हणत त्यांना माऊलींची प्रतीक्षा करावी लागेल. मात्र, माऊली आता पंढरपूरला जाताना 'माझे जीविची आवडीं' म्हणत अनेकांना सोबत घेऊन अलंकापुरातून आनंदाने पंढरीला (Pandharpur) निघाली आणि तिच्याबरोबर तिची अनेक लेकरंही निघाली.


माऊलीच्या आनंदाला आणखी एक कारण होतं ते म्हणजे वैराग्यमूर्तीचे दर्शन. आज माऊलीला पुण्यभूमीत कोण भेटलं तर पांडुरंगाचे परमप्रिय, तुकाराम. औद्योगिक नगरीचा पाहुणचार घेतल्यावर आज तुकाराम महाराजही पहाटे लवकर आपणच लिहून ठेवलेल्या आणि वारकऱ्यांनी गायलेल्या अभंगाच्या चाली ऐकत वारकऱ्यांचा मेळा आणखी वाढवत पुण्यभूमी पुण्याच्या दिशेने निघाले. ज्ञानियांचा राजा ज्ञानदेव आज आपल्याला भेटणार म्हटल्यावर तुकारामाची उत्कंठाही पार ते येण्याआधीच  पुण्यापर्यंत फेऱ्या मारून गेली असेल. दोनही संतांच्या पालख्या पुण्याच्या दिशेने येताना दुतर्फा लाखोंचा जनसमुदाय  त्यांच्या स्वागताला तयार होता. पालख्या आपापल्या मार्गाने पुण्याकडे येत होत्या. जागोजागी रांगोळ्या, फुलांचे सडे, औक्षणाचे ताट घेऊन सामान्यजन या सत्पुरूषांची वाट दोनही मार्गांवर बघतच होती. त्यांच्याबरोबर आलेल्या लाखोंच्या समुदायाची काळजी घेणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, असे वाटत असावे म्हणून की काय, वारकऱ्यांसाठी जागोजागी पाणी, फराळाचे पदार्थ आणखी पुढच्या अवघड प्रवासाआधी पदरी आणखी काही खाण्याचे पदार्थ जबरदस्तीने वारकऱ्यांना देत होती. 'सेवेलागी सेवक झालो' म्हणत आज प्रत्येक नागरिक सेवाभावाने आपापल्या कुवतीप्रमाणे या वारकऱ्यांची सेवा करताना जागोजागी दिसून येत होता. या अशा मायिक वातावरणात दोनही संतांना मिळणारं प्रेम बघून त्यांना सारखं भरून येत असेल नाही? 


अशा हर्षोल्हासाच्या वातावरणात दोनही पालख्या सायंकाळी 5 वाजता पुण्यात येऊन धडकल्या आणि टाळ, मृदंगाच्या ठेक्याने आसमंतालाही ताल धरायला लावले. सर्वत्र माऊली, माऊलीच्या ध्वनिने चैतन्याच्या लहरी उत्पन्न करत हा संगम अवर्णनीय केला. यावेळी उपस्थित लाखो वारकऱ्यांच्या आनंदाचे कोणत्याही शब्दांत वर्णन करता येणार नाही. त्यांच्या  मुखकमलावरील भाव आज या संगमाचे महत्व विशद करत होते. दोनही संतांबरोबर आलेले वारकऱ्यांचे जत्थेच्या जत्थे एकमेकांना अलिंगन देत, चरणस्पर्श करत त्यांना आपापल्या संतांच्या गोष्टी सांगत होते. सर्वांचंच आराध्य असलेल्या पांडुरंगाबाबत तर काय सांगणार, 2 दिवसांपासून वारीत सहभागी झाल्यानंतर जणू त्यांचा प्रत्येक श्वास विठ्ठलच झाला आहे. आषाढीपर्यंत तरी किमान 'आता बोलनेचि नाही, देवाविण काही'अशी खूणगाठच त्यांनी बांधली आहे. चालत असताना थोड्या थोड्या अंतरावर त्यांचा एकत्रितपणे होणारा नामघोष परिसर दणाणून सोडत होता. 


दोनही संतांच्या पालखीचा संगम झाल्यावर दोनही संत पुढे शहराच्या दिशेने निघाले. पुण्यातील एफसी रस्त्यावर आज वारकऱ्यांपेक्षा जास्त बघ्यांचा जनसागर लोटला होता. इथे  तर म्हणजे बघावं तिकडे सेवेसाठी स्पर्धाच. वारकऱ्यांसाठी केवळ पायघड्याच घालायच्या राहिल्या होत्या इतकी सेवा या मंडळींनी केली. लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांनी आज या सेवेबरोबरच नामसंकीर्तनात न्हाऊन निघण्याचं पुण्य मिळवलं आणि वर्षभरासाठी ऊर्जाही चोरून घेतली असं त्यांचे भाव याही वर्षी सांगत होते जसे प्रत्येक वर्षी सांगतात. काही वर्षांपूर्वी आम्ही पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना याचा अनुभव आम्ही घेतला आहे.  वारी येणार म्हणजे, आमच्यासाठी अक्षरश: तो दिवस म्हणज दिवाळीच असायचा. महाविद्यालयानेही त्यादिवशी सु्ट्टी दिलेलीच असायची म्हणून आम्हीही अगदी दुपारपासून वारकऱ्यांची वाट बघत गेटच्या बाहेर कित्येक तास उभे असायचो. वाट बघून बघून कंटाळा यायला व्हायचा. मात्र, दुरून कुठून तरी मृदंगाची थाप ऐकू यायची आणि एकलय कायम राखत पुढे सरकणारे टाळकरी दिसायचे तेव्हा दुपारपासूनचा सारा शीण क्षणार्धात लुप्त होऊन जायचा आणि तात्काळ आम्ही त्यांच्या स्वागताला तयार व्हायचो. ते येताच आम्ही त्यांच्यात सामील होऊन पुढचे काही तास आमचे राहिलेलेच नसायचो. आजची अनेकांच्या चेहऱ्यावर हेच दिसत होतं. 


या वारीतच आज काही विदेशी पाहुणेही मृदंगाच्या तालावर ठेका धरताना पाहायला मिळाले. जी20 निमित्त भारतात आलेले हे विदेशी पाहुणे इथला हा आनंदोत्सव बघून अक्षरश: भारावून गेले. माझी सहकारी देवयानी एदलाबादकर सोबत बोलताना त्यांनी तशा भावना व्यक्तही केल्या. ते एकत्रित गोल करून नाचत होते, तेव्हा मला त्यांच्याकडे बघून थोडं हसूही आलं. त्याचं कारण असं की, मला माझ्या कॉलेजच्या दिवसांत आमच्याबरोबर वारीत सामील होणारे आमचे काही परराज्यातील आणि परदेशातील मित्र, मैत्रिणी आठवले. जे यांच्यासारखेच गोल करून नाचायचे. मला ते बघून नवरात्रीतील गरबाच चालू आहे की काय, असा काही क्षण भास व्हायचा जो आजही झालाच. असो भावना महत्वाच्या. पाहुण्यांचा निरोप घेत घेत दोनही पालख्या पुढे सरकल्या आणि अलका चौकातून पुढे गेल्यावर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी विसावल्या. पालख्या विसावताच कित्येक वारकरीही आपल्या  प्रतिवर्षीच्या ठिकाणी विसाव्याला आले. त्यांचा अत्यंत पुणेरी पद्धतीने पाहुणचार पार पडला. पुणेरी पद्धत म्हणजे काय? ते सर्व वारकऱ्यांना चांगलंच माहिती आहे. पुढले कित्येक दिवस इथला पाहुणचार वारकऱ्यांच्या जिभेवर रेंगाळत राहतो हे काही वारकऱ्यांनी स्वत: मला कित्येकदा बोलून दाखवले आहे.


आज पुण्यातील दोन मुक्कामांपैकी पहिला मुक्काम पार पडेल. उद्या पहाटे लवकर उठून दोनही पालख्यांसमोर काकडा होईल, हरिपाठ होईल  आणि पुण्यनगरीत ठिकठिकाणी कीर्तने पार पडतील. होय होय वारकरी म्हणणाऱ्यांमध्ये काही उगाच जिवाचं पंढरपूर करायला आलेल्या मजेकरींबद्दलच्या मजेशीर किस्स्यांबद्दलही उद्या बोलूच. तूर्तास रामकृष्ण हरि...


वाचा मयूर बोरसे यांचे इतरही ब्लॉग :


Ashadhi wari 2023 : होतील संतांचिया भेटी.....