वय वर्ष 34, 82 कसोटी सामन्यांमध्ये 4931 रन्सची आकडेवारी. 12 शतकं, 25 अर्धशतकं. सर्वोच्च खेळी 188 ची. ही ओळख कसोटी मैदानातल्या 'अजिंक्य रहाणे'ची (Ajinkya Rahane). तोच अजिंक्य कसोटी अजिंक्यपदाच्या फायनलसाठी (World Test Championship Final) संघात कमबॅक करतोय. तेही थेट 15 महिन्यांनी. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेल्या युगात 15 महिन्यांचा काळ खूप असतो. हे सगळं असूनही त्याने करिअरचा नवा टेकऑफ घेतलाय.


उत्तम तंत्र, मोठ्या इनिंग करण्याची क्षमता आणि क्रिकेटच्या पुस्तकातले शैलीदार फटके भात्यात असणाऱ्या रहाणेची कारकीर्द सीसॉ राहिलीय. म्हणजे पाहा ना... 


2020 च्या ऑस्ट्रेलिया (Team India vs Australia) दौऱ्यात पहिल्या कसोटीत सर्वबाद 36ची अपमानास्पद कामगिरी नोंदवल्यानंतर आपल्या बॅटिंगवर चहूबाजूने टीका झाली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी पत्करलेली शरणागती टीकेच्या केंद्रस्थानी होती. नंतर कोहली मायदेशी परतला आणि नेतृत्वाची धुरा अजिंक्यकडे आली. अजिंक्यनेही मिळालेल्या संधीचं सोनं नव्हे तर प्लॅटिनम केलं. आधी 112 ची मनात कोरुन ठेवावी अशी खेळी तो खेळून गेला. स्टार्क, कमिन्स, हेझलवूडसह स्पिनर लायनला ताठ कण्याने सामोरा गेला. तब्बल 359 मिनिटं ठाण मांडून त्याने शतकाची वेस ओलांडली आणि मागच्याच मॅचमध्ये जमिनीत गाडला गेलेला बॅटिंगचा आत्मविश्वास त्याने वर काढला. ही मालिका आपण 2-1 ने जिंकलो. ज्यात अजिंक्यच्या बॅटिंगचा, कॅप्टन्सीचा मोठा रोल होता. तोच अजिंक्य 2022 च्या जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर संघाबाहेर गेला. दरम्यानच्या काळात श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल या तिघांनी धावांचं बाळसं धरलं. अजिंक्य ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्याच म्हणजे साधारण तीन ते सहाव्या क्रमांकावर हे तिघेही फलंदाजी करतात. म्हणजे राहुलने इनिंग ओपनही केलीय. मधल्या फळीत अजिंक्यला तगडी स्पर्धा निर्माण झाली. यातले सूर्यकुमार आणि राहुल तिशीतले तर श्रेयस अय्यर 28 वर्षांचा. त्यातच अजिंक्य कसोटी सामन्यांमध्ये धावांचं सातत्यही हरवून बसलेला.


त्याची कसोटी कामगिरी पाहिली तर जानेवारीतल्या द.आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यापर्यंतच्या 10 डावांमध्ये अवघं 1 अर्धशतक त्याच्या नावावर आहे. तर, शतक थेट डिसेंबर 2020 मध्येच. तीच ऑस्ट्रेलियातील त्याची यादगार इनिंग. इथे धावा रुसल्यानं संघातलं स्थान त्याला गमवावं लागलं.


खरी जिद्दीची कहाणी इथे सुरु होते. म्हणजे वयाच्या तिशीत त्याने संघातलं स्थान गमावलेलं. वनडे, टी-ट्वेन्टीचा वाढता परिणाम, प्रभाव. त्याला आलेलं ग्लॅमर हे सगळं असतानाच अजिंक्य संघातली जागा गमावून बसला होता. तरीही त्याने पुढची तीन वर्षे हार नाही मानली. यंदा मुंबईकडून खेळताना 2022-23 च्या स्थानिक मोसमात त्याने धावांचा रतीब घातला. त्याने टी-ट्वेन्टीचं विजेतेपद जिंकून दिलं. रणजी स्पर्धेवेळीही त्याने आपल्या बॅटचं पाणी दाखवलं. त्याच्या 11 इनिंगमध्ये 634 धावा ही त्याची कमाई. ज्यात होती दोन शतकं, सरासरी 57.63 ची.


अशा वेळी सध्या सुरु असलेल्या आयपीएलनेही त्याला लावून घेण्यात आलेल्या संघाच्या दाराची एक कडी उघडली. धोनीच्या चेन्नईकडून तो 29 चेंडूंत 71 ची एक वादळी खेळी खेळून गेला. मला थेट त्याची 22 फेब्रुवारी 2015 ची वर्ल्डकपमधली इनिंग आठवली. डेल स्टेनच्या तिखट दक्षिण आफ्रिकन माऱ्याला तो पुरुन उरला होता. मेलबर्नच्या मैदानात 60 चेंडूंत 79 ची अफलातून खेळी तो खेळला. ज्यामध्ये होते 7 चौकार आणि तीन षटकार.  काऊंटर अटॅक करण्याची कमाल कपॅसिटी त्याच्यात आहे. जमिनीलगतच्या देखण्या ड्राईव्हजसह त्याची आकाशविहार करणाऱ्या टोलेजंग फटक्यांशीही दोस्ती आहे, हे त्याने जसं त्यावेळी दाखवून दिलेलं. तसं त्याने 8 वर्षांनी इथे आयपीएलच्या मैदानातही दाखवून दिलं. तेही क्रिकेटच्या पुस्तकातल्या फटक्यांना इम्प्रोवाईज्ड फटक्यांची जोड देत. ट्वेन्टी-20 हा तरुणांचा, फिटनेसचा खेळ आहे. त्या टी-ट्वेन्टीत धोनीच्या नेतृत्वाखाली अजिंक्य बहरतोय. धोनीच्या कर्णधारपदाखाली खेळण्याच्या अनुभवाबद्दल तो म्हणाला, धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये खेळताना तुम्ही नेहमी काहीतरी शिकत असता. एक क्रिकेटर आणि फलंदाज म्हणून तुमच्यात भरच पडते. धोनीनेच त्याला या आयपीएल स्पर्धेत तिसऱ्या नंबरवर बॅटिंगला येत सकारात्मक खेळ करण्यास प्रवृत्त केलं आणि त्याचा रिझल्ट आपल्यासमोर आहे.


प्रतिकूल परिस्थितीत कूल राहणारा कॅप्टन त्याला आयपीएलमध्ये लाभलाय. अजिंक्य करिअरच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे त्याचं वय आणि त्याला संघात असणारी स्पर्धा वाढतच जाणार आहे. अशा खडतर वाटेमध्ये 'तू लढ मी तुझ्यासोबत आहे' असं म्हणणारा कॅप्टन दीपस्तंभ असतो. गांगुलीने युवराज, धोनी, सेहवाग, हरभजन यांच्यामध्ये अशीच जिद्दीची आणि आक्रमकतेची ज्वाला पेटवलेली आपण पाहिलीय. तर, अजिंक्यला आयपीएलच्या मैदानात धोनीचा पाठिंबा मिळतोय. ज्याचा त्याला पुढच्या प्रवासात नक्की फायदा होईल.


त्यातच कसोटी अजिंक्यपद संघाकडे नजर टाकल्यास आपल्याला लक्षात येतं की, संघात अजिंक्य व्यतिरिक्त रोहित, गिल, कोहली, पुजारा आणि राहुल असे पाच फलंदाज आहेत. म्हणजे पाच गोलंदाज घेऊन खेळायचं निश्चित केलं तरच अजिंक्य आणि राहुल यांच्यात मधल्या फळीतल्या जागेसाठी स्पर्धा होऊ शकते. अन्यथा अजिंक्य प्लेईंग इलेव्हनमध्ये असेल हे नक्की. त्यात सामना चिवट आणि खडूस कांगारुंशी आहे. मैदान आणि हवामानही इंग्लंडमधलं आहे. लढाई कसोटी अजिंक्यपदाची आहे, अजिंक्य संघात आलाय. तो प्लेईंग इलेव्हनमध्येही येऊ दे. त्याच्या कसोटी कारकीर्दीला नवा ऑक्सिजन या मॅचमध्ये लाभू दे, याच शुभेच्छा...!