हजारो किलोमीटर पसरलेल्या रुक्ष वाळवंटात नितळ पाण्यानं भरलेल्या दोन बारमाही विहिरी असाव्या, असे निळ्याशार कडांचे हिरवेगार डोळे, वाळवंटाच्या दाहकतेची जाणीव करुन देणारे चेहऱ्यावरचे भाव, विस्कटलेले केस आणि तापलेल्या सूर्यानं डोक्यावर सावली धरावी अशी तांबड्या रंगाची ओढणी. युद्ध आणि दहशतवादानंतरच्या निर्वासितांचं जगणं मांडणारा हा चेहरा...
फोटो सौजन्य - स्टिव्ह मॅक्क्युरी, नॅशनल जिओग्राफिक (National Geographic)
1985 साली नॅशनल जिओग्राफीच्या फोटोग्राफरनं काढलेला हाच तो फोटो, ज्यानं शरबत गुला या अफगानी मुलीचं आयुष्य बदललं. शरबत गुला सध्या 45 वर्षांची आहे. गेल्या 12 डिसेंबरला अफगाणिस्तान सरकारतर्फे तिला तब्बल 3 हजार स्वेअर फूटांचा बंगला देण्यात आला. शिवाय महिन्याचा खर्च भागवण्यासाठी अफगाणिस्तान सरकारतर्फे तिला दरमहा 700 डॉलर म्हणजेच जवळपास 45 हजार रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे. यामध्ये ती घरखर्च भागवू शकते.
(अफगान सरकारने शरबत गुला यांना दिलेला बंगला, फोटो - अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस ऑफ द प्रेसिडंट अफगाणिस्तान)
पण या अफगान गर्लचा संघर्ष काही सोपा नव्हता. साल 1985 चं होतं. नॅशनल जिओग्राफीचे फोटोग्राफर स्टिव्ह मॅक्क्युरी पाकिस्तानात एका असाईन्मेंटवर होते. युद्धाची दाहकता सांगणारे फोटो त्यांना कॅमेऱ्यात टिपायचे होते. आणि तेवढ्यात तिथल्या एका निर्वासितांच्या कॅम्पमध्ये एक हिरव्यागार डोळ्यांची 12 वर्षांची मुलगी त्यांच्या नजरेस पडली. कॅमेऱ्याची लेन्स त्या मुलीच्या दिशेनं फिरली, चेहरा फोकस झाली आणि तापलेल्या उन्हाच्या प्रकाशामध्ये अफगाणिस्तानच्या छोट्या मोनालिसाचा चेहरा कैद झाला.
शरबत 6 वर्षांची असताना एका चकमकीत तिचे आई-वडील स्वर्गवासी झाले. न कळत्या वयात डोक्यावरचं छत्र हरपलं, आपल्या इतर भावंडांसोबत ती पाकिस्तानातल्या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये आश्रयाला आली. तिथंच स्टिव्हनं हा फोटो काढला. 1985 साली या अफगानी मोनालिसाचा फोटो नॅशनल जिओग्राफी मासिकाच्या मुख्य पानावर झळकला आणि रातोरात ही छोटी मोनालिसा विश्वजात झाली.
फोटो सौजन्य - स्टिव्ह मॅक्क्युरी, नॅशनल जिओग्राफिक (National Geographic)
जग या छोट्या मुलीच्या सौंदर्यात वेडं झालं होतं, पण ही मोनालिसा एकाएकी गायब झाली, पाकिस्तानात तिचा शोध सुरु झाला, पण ती काही सापडली नाही. तब्बल 17 वर्षांनंतर म्हणजे 2002 मध्ये स्टिव्ह मॅक्क्युरी पुन्हा पाकिस्तानात आले. त्यांनी सगळ्या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये शरबतचा शोध घेण्यास सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांची चक्क शरबतच्या पतीशी गाठभेट झाली, आणि पुन्हा ही छोटी मोनालिसा, जी तेव्हा 29 वर्षांची झाली होती, आणि जिला एक गोंडस चिमुरडाही होता, त्यांची भेट झाली. स्टिव्हनं पुन्हा शरबतचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो घेतले.
(फोटो - अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस ऑफ द प्रेसिडंट अफगाणिस्तान)
मात्र 3 वर्षांपूर्वी पाकिस्तानात राहणाऱ्या शरबतच्या आयुष्यात वादळ आलं. हॅपीटायटीस सीच्या लागणीमुळं तिच्या पतीचं निधन झालं, त्यातच खोटा पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली. न्यायालयानं तिला तब्बल 14 वर्षांची कैद आणि 5 हजार डॉलर म्हणजेच जवळपास सव्वा तीन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनवली. तिची 4 मुलं पुन्हा रस्त्यावर आली.
(फोटो - अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस ऑफ द प्रेसिडंट अफगाणिस्तान)
पाकिस्तानी मीडियात ही बातमी खूप झळकली. अफगाणिस्तान सरकारनंही आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीनं पाकिस्तानवर दबाव आणला. आणि दोन आठवड्यानंतर तिची सुटका करण्यात आली. तिला पुन्हा तिच्या मायदेशात, म्हणजे अफगाणिस्तानात रवाना करण्यात आलं. आता शरबत आणि तिच्या सगळ्या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी अफगाणिस्तान सरकारनं उचलली आहे. पालन-पोषणासह आरोग्य सुविधांचा खर्चही अफगाणिस्तान सरकारच उचलणार आहे. शरबत ही अफगाणिस्तानची ओळख आहे. त्यामुळं तिची पुरेपुर काळजी घेण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलंय.
एका फोटोनं आयुष्य बदललेल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत, कारण कॅमेरा फक्त एक चित्र त्याच्या चौकटीत कैद करत नाही, तर भूतकाळही कैद करण्याची ताकद ठेवतो. यात कैद झालेल्या आठवणींवर काळाचाही परिणाम होत नाही. त्यामुळंच गेल्या शतकात बनलेलं कॅमेरा हे यंत्र सर्वात शक्तीशाली ठरतं.
याआधीचा ब्लॉग : कॅमेऱ्याच्या चौकटीतलं विश्व
कॅमेऱ्याच्या चौकटीतलं विश्व : एका फोटोने आयुष्य बदललं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2017 04:01 PM (IST)
एका फोटोनं आयुष्य बदललेल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत, कारण कॅमेरा फक्त एक चित्र त्याच्या चौकटीत कैद करत नाही, तर भूतकाळही कैद करण्याची ताकद ठेवतो. यात कैद झालेल्या आठवणींवर काळाचाही परिणाम होत नाही. त्यामुळंच गेल्या शतकात बनलेलं कॅमेरा हे यंत्र सर्वात शक्तीशाली ठरतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -