Solar Eclipse 2024 : ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला (Solar Eclipse) फार महत्त्व आहे. कारण या ग्रहणाच्या प्रभावामुळेच राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम घडतात. यावर्षी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण तब्बल 54 वर्षांनंतर लागणार आहे त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. हे सूर्यग्रहण अंदाजे 5 तास 25 मिनिटं चालेल. विशेष म्हणजे, चैत्र नवरात्रीच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे.


सूर्यग्रहणाची वेळ काय असेल? 


अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या म्हणण्यानुसार, 8 एप्रिल रोजी संपूर्ण सूर्यग्रहण साधारण 70 मिनिटं चालणार आहे. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी सुरू होणार असून 9 एप्रिल रोजी रात्री 2 पर्यंत असणार आहे. ग्रहणाची वेळ ही रात्रीची असल्याने भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. 


सूर्यग्रहण कोणत्या देशांमध्ये दिसणार? 


8 एप्रिल 2024 रोजी हे सूर्यग्रहण आर्क्टिक, मेक्सिको, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, उत्तर अमेरिका (अलास्का वगळता), पश्चिम युरोप, पॅसिफिक, इंग्लंडचा वायव्य प्रदेश, मध्य अमेरिका, आयर्लंड, अटलांटिक आणि कॅनडा या देशांमध्ये दिसणार आहे. जगातील ज्या भागात सूर्यग्रहण होणार आहे, त्या ठिकाणी सूर्यमालेत उपस्थित शुक्र आणि गुरू देखील दिसू शकतात. याशिवाय सूर्यग्रहणाच्या वेळी धूमकेतू ताराही स्पष्टपणे दिसणार आहे. त्यामुळे हे सूर्यग्रहण विशेष असणार आहे. 


सूर्यग्रहण कुठे पाहाल?


तुम्हाला जर हे सूर्यग्रहण पाहायचं असेल तर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे हे सूर्यग्रहण पाहू शकतात. यासाठी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA) 8 एप्रिल रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण करणार आहे. ते थेट पाहण्यासाठी तुम्ही https://eclipse-explorer.smce.nasa.gov वर क्लिक करू शकता. असं म्हटलं जातं की, सूर्यग्रहण हे कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये. त्यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होते. त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी, आपण विशेष प्रकारचे काच किंवा ऑप्टिक्स वापरू शकता.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा:


Surya Grahan 2024: तब्बल 54 वर्षांनंतर 8 एप्रिलला लागणारे सर्वात मोठे सूर्यग्रहण अतिशय प्रभावशाली, 'या' चार राशी होतील करोडपती