Shravan Somvar 2024 : श्रावण महिना हा शिवशंकराच्या पूजेला समर्पित आहे, त्यामुळे या महिन्यातील सोमवारांना देखील विशेष महत्त्व आहे. शिवभक्त श्रावणी सोमवारचं व्रत करतात, या दिवशी कडक उपवास पाळला जातो. श्रावणातील दर सोमवारी शिवमूठ (Shivamuth) वाहण्याची पद्धत आहे. ही शिवमूठ म्हणजे नेमकं काय? आणि शिवामूठीत काय वाहिलं जातं आणि यावेळी कोणता मंत्र म्हटला जातो? सविस्तर जाणून घेऊया.
तब्बल 18 वर्षांनंतर यंदा श्रावणात 5 सोमवार असतील. प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवमूठ महादेवाला अर्पण केली जाते. शिवामूठ वाहिल्यामुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते.
कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ वाहावी?
पहिला सोमवार – 05 ऑगस्ट, पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ वाहावी.
दुसरा सोमवार – 12 ऑगस्ट, दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ वाहावी.
तिसरा सोमवार – 19 ऑगस्ट, तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग वाहावी.
चौथा सोमवार – 26 ऑगस्ट, चौथ्या सोमवारी शिवामूठ जव वाहावी.
पाचवा सोमवार – 02 सप्टेंबर, पाचव्या सोमवारी शिवामूठ हरभरा वाहावी.
कशी वाहावी शिवमूठ? (How to offer Shivamuth)
श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी सर्वप्रथम त्याला पाणी, दूध, 11 बेलाची पानं, फुलं अर्पण केली जातात. पूजा करताना धूप लावावं, त्यानंतर महादेवाला खडीसाखर अर्पण करावी. त्यानंतर शिवमूठ अर्पण करावी. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते.
शिवमूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा? (Shivamuth Mantra)
शिवमृठ अर्पण करताना "ओम नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने । शृंगिभृंगि महाकालगणयुक्ताय शंभवे।।" हा मंत्र म्हणावा. किंवा "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा" असं तीन वेळा म्हणावं.
शिवमूठ वाहण्याचं महत्त्व (Shivamuth Significance)
शिवमूठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जातो आणि ती प्रत्येक महिलेनं वाहावी, असं सांगितलं जातं. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्षं महाराष्ट्रात स्त्रिया हे व्रत करतात. श्रावणातील 5 सोमवार शिवमूठ वाहिल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात, असं सांगितलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shravan 2024 : श्रावण मासाला सुरुवात; पहिल्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?