Shattila Ekadashi 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी म्हणजेच षटतिला एकादशी आज 25 जानेवारी 2025 रोजी आहे. हिंदू धर्मात या एकादशीला फार महत्त्वाचं स्थान आहे. तसेच, षटतिला एकादशीचं व्रत केल्याने भक्तांना पुण्य फळ मिळते अशी मान्यता आहे.
षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचा वापर करणं शुभ मानलं जातं. या तिळाच्या दान करण्याच्या नियमामुळेच या एकादशीला षटतिला एकादशी असं म्हणतात. या दिवशी तीळ, अन्न, गूळ आणि सुती कपडे दान करण्याची परंपरा आहे. या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.
तिळाचं दान
षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचं दान करणं फार पवित्र मानलं जातं. यामुळे नवग्रहांची शांती होती. तसेच, सुख-समृद्धी प्राप्त होते. तिळाचा उपयोग स्नान, दान आणि अन्नपदार्थांत केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, तिळाचा वापर केल्याने सर्व पाप नष्ट होतात. आणि मानसिक शांती मिळते.
सुती कपडे दान करावेत
या महिन्यात थंडीचे दिवस असल्याने गरजूंना तुम्ही सुती कपडे दान करु शकता. हे अतिशय पुण्याचं काम मानलं जातं. यामुळे फक्त समाजसेवाच होत नाही तर देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो.
गुळाचं दान करावं
गुळाचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. गुळाचं दान केल्याने आयुष्यात प्रगती होते तसेच, सकारात्मक ऊर्जा मिळते. डोळे आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गुळाचं दान करणं फार शुभ मानलं जातं.
अन्नदान करा
अन्नदानाला सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच, जीवनात धन-धान्याची कमतरता भासत नाही.
षटतिला एकादशी तिथी आणि वेळ
एकादशी तिथीची सुरुवात - 24 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 07.25 मिनिटांनी सुरु झाली.
एकादशी तिथीची समाप्ती - 25 जानेवारी 2025 रोजी रात्री 08.31 वाजता व्रत ठेवण्यासाठी आणि दान करण्यासाठी 25 जानेवारीचा दिवस शुभ आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :