Shardiya Navratri 2024 : गणेशोत्सवाचा उत्सव साजरा होता होता आता नवरात्रौत्सवाचा सण जवळ आला आहे. हिंदू धर्मात नवरात्रौत्सवाला (Navratri) विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की, वर्षातून 4 वेळा नवरात्रौत्सवाचा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री, आणि 2 गुप्त नवरात्री. नवरात्रीचे 9 दिवस भक्त देवीचा उपवास करतात. तिची पूजा करतात. त्यानुसार, यंदाची नवरात्र पुढच्या महिन्यापासून म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 


नवरात्रौत्सवात देवीची पूजा, आराधना करण्यासाठी आपल्याला पूजा विधीत कोणते साहित्य लागणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


शारदीय नवरात्री कधीपासून


हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीची सुरुवात 2 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजून 18 मिनिटांनी होणार आहे. तर, या तिथीची समाप्ती 3 ऑक्टोबर रोजी रात्री 02 वाजून 58 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे, उदय तिथीनुसार, 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होईल. 


पहिल्या दिवशी होणार देवीची पूजा 


शारदीय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवी दुर्गेच्या पहिल्या रुपाची म्हणजेच देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि कलश स्थापन केल्यानंतर शैलपुत्री देवीची आराधना केली जाते. 


घटस्थापना मुहूर्त (Ghatasthapana Muhurta 2024)


नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल.


कलश स्थापनेचे साहित्य 


नवरात्रौत्सवात, कलशसह पंचपल्लव किंवा आंब्याची पाने, मातीची भांडी, पाणी, स्वच्छ कपडा, नारळ, सुपारी, गंगाजल, नाणी, दूर्वा, गहू आणि तांदूळ, हळद, पानं, कापूर इ. सामानांच्या यादीची आवश्यकता असते. 


पूजेसाठी लागणारे साहित्य (Shardiya Navratri Puja Samagri 2024)


तूप, धूप, फळ, पान, फूल, लवंग, दुर्वा, कापूर, अक्षता, सुपारी, नारळ, इलायची, लाल ओढणी, लाल वस्त्र, पान, लाल चंदन, देवीचा फोटो, दिवा, श्रृंगाराचं सामान यांसारखं साहित्य पूजेसाठी लागणार आहे. 


देवीच्या नवरात्रौत्सवात सर्व भक्त 10 दिवस एकत्र येतात. देवीचा पूजा अर्चा करतात. तिला प्रसन्न करतात तसेच तिच्यासाठी 10 दिवसांचा उपवासही करतात. या दिवासांत ठिकठिकाणी गरबा देखील खेळला जातो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shardiya Navratri 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? शारदीय नवरात्री कधीपासून? जाणून घ्या घटस्थापना मुहूर्त आणि अचूक पूजा विधी