Pitru Paksha 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, उद्यापासून म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 पासून पितृपक्षाला (Pitru Paksha) सुरुवात होणार आहे. पितृपक्षाचं हिंदू सनातन धर्मात फार महत्त्वाचं स्थान आहे. मान्यतेनुसार, या 15 दिवसांत पितर आपल्या कुटुंबियांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पूजा-अर्चा, तर्पण केलं जातं. असं म्हणतात की, पितरांची विधीवत पूजा केल्यास वंश प्राप्ती होते. आणि पितरांच्या आशीर्वादाने सुख-सौभाग्य मिळतं. वैदिक शास्त्रानुसार, पितृपक्षात काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. अन्यथा पितर नाराज होतात. त्यामुळेच, पितृपक्षात काय करावं आणि काय करु नये हे जाणून घेऊयात.
पितृपक्षात काय करावं आणि काय करु नये? (What to do and What Not to do in Pitru Paksha)
1. शास्त्रानुसार, पितृपक्षात कोणतंही शुभ कार्य जसे की, विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात करु नये.
2. पितृपक्षात कोणाशीही खोटं बोलू नका. तसेच, अपशब्द वापरु नका. कारण यामुळे पितर नाराज होऊ शकतात.
3. पितृपक्षाच्या दरम्यान मद्यपान, पान, वांगी, कांदा, मांसाहारी पदार्थ, पांढरे तीळ, दुधी, मुळा, लसूण, शिळे अन्न, मसूर डाळ, काळं मीठ यांसारख्या पदार्थांचं सेवन वर्जित मानलं जातं. यामुळे पितर नाराज होतात.
4. पितृपक्षात पितरांचं तर्पण करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर केला जातो. यासाठी तर्पण करण्यासाठी पांढऱ्या तिळाचा चुकूनही वापर करु नका. तसेच, श्राद्धाचं जेवण बनवण्यासाठी लोखंडाच्या भांड्याचा वापर करु नका.
5. पितृपक्षात पितरांसाठी जे काही अन्नपदार्थ बनवाल ते आधी चाखून पाहू नका. तसेच, या काळात तुमच्या दारापाशी जर गाय, ब्राह्मण, कुत्रा किंवा भिकारी, गरीब व्यक्ती दिसल्यास त्यांचा अपमान करु नका.
6. पितरांच्या तर्पणासाठी दुपारची वेळ उत्तम आहे. यासाठी ब्रह्म मुहूर्तात श्राद्ध करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :