Pitru Paksha 2024 : सध्या पितृपक्ष सुरु आहे. पितृपक्षात (Pitru Paksha 2024) पितरांना खुश करण्यासाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान यांसारखे कार्य केले जातात. त्याचबरोबर, पितृपक्षाच्या दिवसांत काही नियमांचं शिस्तीने पालन करणं गरजेचं आहे. जसे की, पितृपक्षात तामसिक पदार्थांचं सेवन करु नये. त्यातही मांस, मासे आणि मदयपान वर्जित आहे. 


जर पितृपक्षात एखाद्या व्यक्तीने मांस, मासे, मदयपान सारख्या पदार्थांचं सेवन केलं तर काय परिणाम होऊ शकतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


पितृपक्षात मांसाहाराचं सेवन का करु नये?


ज्योतिष शास्त्रानुसार, सनातन धर्मात झाडे, झुडुपे, रोप, पशु, पक्षी या सगळ्यांची पूजा केली जाते. झाडा-झुडुपांत देवी-दैवतांचा वास असतो. तर, पशु, पक्षी हे त्यांचे वाहन असतात. सनातन धर्मात हिंसेला स्थान नाही. तसेच, जी व्यक्ती असं करत असेल त्या व्यक्तीला त्याच्या पापांची शिक्षा दिली जाते. त्या व्यक्तीला त्याचे कर्म भोगावे लागतात असं म्हणतात. 


पितर नाराज होतात...


पितृपक्षाच्या 16 दिवसांत पितरांची पूजा केली जाते. अशा वेळी जर तुम्ही पितृ पक्षात मांस, मदयपानाचं सेवन केलं तर पितर नाराज होऊ शकतात. यामुळे तुम्हाला पितृदोष देखील लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, जर पितर नाराज झाले तर घरात वाद-विवाद, रोगराईचं वातावरण निर्माण होऊ शकतं. 


पितृपक्षात करा सात्विक भोजन


पितृपक्षात नेहमी सात्विक भोजनाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पितृपक्षात जर चांगल्या सवयींचं आचरण केलं तर पितर तुमच्यावर खुश होतात. तसेच पितृपक्षात केस कापणे, नखं कापणे यांसारखी कामं करु नयेत. या काळात नवीन वस्त्र, सोनं, चांदी यांसारख्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं.


पितृपक्ष हा पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ असतो. त्यामुळं खरं तर तो चांगला काळ आहे. मात्र, या काळात अनेक गोष्टी निषिद्ध समजल्या जातात. विशेषत: या कालावधीत कुठल्याही नव्या कामाची सुरुवात केली जात नाही. तसंच, कुठलीही मोठी खरेदी केली जात नाही. यंदा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान पितृपक्ष आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Pitru Paksha 2024 : पितृपक्षात नवीन गोष्टी का खरेदी करू नये? प्रेमानंद महाराज सांगतात...