Papmochani Ekadashi 2022 : चैत्र महिना सुरू झाला आहे. धर्मग्रंथांमध्ये या महिन्याचे विशेष धार्मिक महत्त्व सांगण्यात आले आहे. या महिन्यातील एकादशी तिथी महत्त्वाची मानली जाते. पंचांगानुसार 28 मार्च 2022 रोजी, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला ‘पापमोचनी एकादशी’ (Papmochani Ekadashi 2022) म्हणतात. एकादशीच्या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात आणि प्रत्येकाचे वेगळे महत्त्व असते.


चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला ‘पापमोचनी एकादशी’ म्हणतात. यावेळी पापमोचनी एकादशी 28 मार्च रोजी येत आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाते.


पौराणिक मान्यतेनुसार पापमोचनी एकादशीमुळे सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. या एकादशीमुळे जीवनातील जबाबदारीपासून कधीही पळ काढू नये, याची जाणीव करून दिली जाते. आपल्यावरील जबाबदाऱ्या प्रत्येक पार पाडल्याच पाहिजेत. जीवनात जाणून बुजून चूक झाली असेल तरी, या एकादशीचे व्रत केल्यास त्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते. म्हणूनच ‘पापमोचनी एकादशी’ला पापांपासून मुक्ती मिळण्यासाठीची एकादशी असेही म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने भक्तांना भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.


कधी आहे ‘पापमोचनी एकादशी’?  (Papmochani Ekadashi 2022 Date)


‘पापमोचनी एकादशी’ 27 मार्च 2022 रोजी संध्याकाळी 06:04 वाजता सुरू होईल.


पापमोचनी एकादशी तिथीची समाप्ती 28 मार्च 2022 दुपारी 04:15 वाजता होईल.


पापमोचनी एकादशी व्रत कथा (papmochani ekadashi 2022 vrat katha)


पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी चैत्ररथ सुंदर वनात च्यवन ऋषींचा पुत्र मेधवी तपश्चर्यामध्ये लीन झाले होते. एके दिवशी अप्सरा मंजुघोष तिथून गेली. मेधवीला पाहून अप्सरा त्याच्यावर मोहित झाली. अप्सरेने मेधवीला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला यश मिळाले नाही. अप्सरा उदास होऊन बसली, तेव्हा कामदेव तेथून जात होते. कामदेवाने अप्सरेचा हेतू समजून घेतला आणि तिला मदत केली. त्यामुळे मेधवी मंजुघोषाकडे आकर्षित झाले.


.. आणि अप्सरेला पिशाच होण्याचा शाप मिळाला


अप्सरेच्या या प्रयत्नामुळे मेधवीला भगवान शिवाच्या तपश्चर्येचा विसर पडला. खूप वर्षांनी मेधवीला त्याची चूक आठवली, तेव्हा रागाच्या भरात त्याने मंजुघोषाला पिशाचिनी होण्याचा शाप दिला. मात्र, नंतर मेधवीलाही आपली चूक समजली आणि त्याने या कृत्याबद्दल माफी मागितली. अप्सरेच्या विनंतीवरून मेधवीने पापमोचनी एकादशीच्या व्रताचे महत्त्व सांगून व्रत योग्य प्रकारे पूर्ण व्हावे, असे सांगितले.


अप्सरा मंजुघोषाने मेधवीने सांगितल्याप्रमाणे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला ‘पापमोचनी एकादशी’चा उपवास केला आणि या व्रताचे उद्यापन केले. यामुळे तिचे पाप दूर झाले आणि तिला पिशाच योनीतून मुक्ती मिळाली. यानंतर अप्सरा पुन्हा स्वर्गात परतली. दुसरीकडे, मेधवीनेही ‘पापमोचनी एकादशी’चे व्रत पाळले. या व्रताच्या प्रभावाने मेधवीही पापमुक्त झाला.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha