Magh Gupt Navratri 2024 : हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात 4 नवरात्री साजऱ्या केल्या जातात, त्यातील 2 मुख्य, तर 2 गुप्त नवरात्री असतात. या नवरात्री चैत्र, अश्विन, आषाढ आणि माघ महिन्यात येतात. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात गुप्त नवरात्री (Gupt Navratri 2024) सुरु होते. चैत्र आणि शारदीय नवरात्रीप्रमाणेच गुप्त नवरात्री (Navratri) वर्षातून दोन वेळा येते. माघ आणि आषाढ महिन्यात गुप्त नवरात्री असतात .
माघ महिन्याची गुप्त नवरात्री यंदा 10 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी या नवरात्रीमध्ये गुप्त रुपाने पूजा पाठ केला जातो. या कालावधीत संपूर्ण 9 दिवस भक्त दुर्गेच्या 9 रूपांची भक्तिभावाने पूजा करतात. या कालावधीत ‘गुप्त’ रूपाने पूजापाठ केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. 18 फेब्रुवारीला गुप्त नवरात्री समाप्त होईल.
माघी नवरात्र कधीपासून कधीपर्यंत?
हिंदू कॅलेंडरनुसार, माघ गुप्त नवरात्री शनिवारपासून (10 फेब्रुवारी) सुरू झाली आहे आणि रविवारी (18 फेब्रुवारी) ही गुप्त नवरात्र समाप्त होईल. ही गुप्त नवरात्री पूर्ण 9 दिवस साजरी केली जाईल, ज्यामध्ये देवीच्या 9 रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते.
गुप्त नवरात्री शुभ मुहूर्त
माघ नवरात्री घटस्थापना दिवस : 10 फेब्रुवारी 2024 (शनिवार)
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
पहिला शुभ मुहूर्त : सकाळी 8.45 ते 10.10 वाजेपर्यंत (एकूण कालावधी - 1 तास 25 मिनिटं) असेल.
दुसरा शुभ मुहूर्त (अभिजीत मुहूर्त) : दुपारी 12.13 ते 12.58 वाजेपर्यंत (एकूण कालावधी - 44 मिनिटं)
घटस्थापनेची पूजा पद्धत
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. कलशाची स्थापना करताना दुर्गा देवीचा फोटो किंवा पोथी समोर ठेवली जाते. गुप्त नवरात्रीमध्ये देवी आदिशक्तीच्या दहा रुपांची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी पूजेदरम्यान कमळाचं फूल अर्पण करावं, असं केल्याने दुर्गादेवी प्रसन्न होते. गुप्त नवरात्रीच्या वेळी मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा, यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरात ऐश्वर्य येईल.
या आहेत देवीच्या दहा महाविद्या
गुप्त नवरात्रीत 10 महाविद्यांची पूजा केली जाते. यात काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरा भैरवी, धुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला ही दहा देवीची रुपं आहेत. दुर्गा मातेच्या या 10 महाविद्यांचं पूजन केल्याने मनुष्याला विशेष सिद्धी प्राप्त होते आणि जीवनातील दु:ख दूर होतात, अशी मान्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :