Madhya Pradesh :  मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून (Bhopal) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळच्या एका महिलेने पतीकडून एका विचित्र कारणासाठी घटस्फोट मागितला आणि ते म्हणजे, तिचा नवरा तिला गोव्याऐवजी अयोध्येला घेऊन गेला. महिलेने कौटुंबिक न्यायालयात पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला आहे. बायकोचा आरोप आहे की, तिच्या नवऱ्याने तिला गोव्याला नेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अखेरच्या क्षणी तो तिला अयोध्येला घेऊन गेला. सध्या पती-पत्नी दोघांचीही समजूत घातली जात आहे.


ऑगस्ट 2023 मध्ये झालं होतं दोघांचं लग्न


हे प्रकरण भोपाळच्या पिपलानी भागातील असल्याची माहिती आहे. ऑगस्ट 2023 मध्ये दोघांनी येथे लग्न केलं. या महिलेचा नवरा आयटी प्रोफेशनल असून चांगला पगार कमवतो. लग्नानंतर दोघांना हनिमूनला जायचं होतं. यावेळी बायको म्हणाली, आपण परदेशात कुठेतरी फिरायला जाऊ, पण नवरा म्हणाला, घरी वयोवृद्ध आई-वडील असल्याने आपण देशातच कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ. जर आपण परदेशात गेलो तर घरी आई-वडिलांकडे बघायला कोणी नसेल.


दरम्यान, दोघांमध्ये झालेल्या बऱ्याच वादानंतर दोघांनी सहमताने गोव्याला जाण्याचं ठरवलं. आता बायकोचा आरोप असा आहे की, प्लॅनिंगनुसार आम्ही गोव्याला जायचं ठरवलं होतं, पण जाण्याच्या एक दिवस आधी नवऱ्याने कार्यक्रम बदलला आणि अयोध्या आणि बनारसला जाण्याची चर्चा सुरू केली. नवऱ्याने सांगितलं की, त्याला आईला अयोध्या राम मंदिरात घेऊन जायचं आहे आणि म्हणून आपण अयोध्या आणि बनारसमध्ये फिरुया.


दोघांमध्ये झाला बराच वाद


आता या सगळ्यानंतर बायको नवऱ्यासोबत अयोध्येला गेली खरी, पण घरी परतल्यावर तिने तांडव घातला. घरी आल्यावर त्या दोघांचा वाद झाला, त्यामुळे बायकोने कंटाळून कोर्टात धाव घेतली आणि घटस्फोटासाठी अर्ज केला. माहिती देताना रिलेशनशिप कौन्सिलर शैल अवस्थी यांनी सांगितलं की, पत्नीने पतीवर विश्वास तोडण्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. पत्नीचा आरोप आहे की, तिचा पती आपला बहुतेक वेळ आपल्या कुटुंबासाठी घालवतो आणि तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तो तिला वेळ देत नाही, फक्त त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना वेळ देतो आणि त्यांचीच काळजी करतो.


हेही वाचा:


VIDEO : पोलिसांच्या गाडीचं पेट्रोल संपलं तर कैद्यांनीच मारला गाडीला धक्का; बिहार पोलिसांच्या करामतीने सर्वच हैराण


Agra : एका मशेरीने मोडला संसार! पत्नी दिवसातून तीनदा मशेरी लावते म्हणून काढलं घराबाहेर