Jaya Kishori On Abp Majha Mahakatta : 'जेव्हा तुम्ही मनातून खुश असता, तुमचे हेतू चांगले असतात तेव्हा तुम्ही काहीच न करता आपसूकच तुमच्या आजूबाजूच्या लोकांना खुश करता.' आपल्या सकारात्मक ऊर्जेने लोकांना भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या प्रवचनकार जया किशोरी (Jaya Kishori) आज एबीपी माझाच्या (ABP Majha) महाकट्ट्यावर (Majha Maha Katta) आल्या होत्या. यावेळी त्यांनी काही गोष्टींवर स्पष्टपणे मत मांडलं आहे.
वयाच्या 7-8 व्या वर्षीच निवडला भक्तीचा मार्ग...
मी माझ्या वयाच्या आधीच समजूतदार झाले. कारण मी वयाच्या 7-8 वर्षी काम करायला सुरुवात केली. मग ते भजन गाणं असो. वयाच्या बाराव्या वर्षी मी पहिली कथा केली. हे सगळं आपसूकच घडत होतं. यामध्ये मी काहीच असं ठरवलं नव्हतं. त्यात माझ्या कुटुंबातून हा मार्ग कोणीच निवडला नाहीये. लोक मला भजन, कीर्तन गायला बोलवायचे आणि मी जायचे. पण, मला पहिल्या दिवसापासून देवाच्या गोष्टी, शास्त्रांचा अभ्यास करायला फार आवडत होतं. पण माझ्या घरचं वातावरणही तसंच धार्मिक आहे. याच गोष्टी करता करता मला आनंद यायचा.
पण जेव्हा मी 14-15 व्या वर्षी कथावाचनाला सुरुवात केली तेव्हा जाणवलं की लोक तुम्हाला देवाच्या स्थानी तुम्हाला ठेवतायत. तेव्हा मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारलं की मी खरंच काही सिरीअस काम करतेय का. तेव्हा वडिलांनी मला या क्षेत्रातील सगळे चढ-उतार सांगितले आणि मग मी हाच मार्ग निवडला असं प्रवचनकार जया किशोरी यांनी सांगितलं.
रामकथा, भजन किर्तनाची तयारी कशी करता?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो. माझ्या जडणघडणीत आई-वडिलांचा देखील तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. वयाच्या सतरा-अठराव्या वर्षी मी भागवदची दिक्षा घेतली. त्यानंतर स्वत:चा अभ्यास केला. संगीत ऐकलं. धार्मिक पुस्तकं वाचली. आता कथेच्या माध्यमातून सामाजिक मुद्द्यांवर कसं बोलायचं याचा अभ्यास करावा लागतो. अशा शब्दांत आपल्या कारकीर्दीबाबत सांगताना जया किशोरी यांनी आपला प्रवास उलगडला.
स्ट्रेस आणि सेल्फ डाऊटवर मात कशी करायची?
मला एक गोष्ट आयुष्यात दैवी मिळाली आहे. त्यावर मला कधीच मात करावी लागली नाही तो म्हणजे आत्मविश्वास...मला सेल्फ डाऊट कधीच आला नाही. मला असं वाटतं जर मी प्रामाणिकपणे मेहनत करतेय तर मी कोणतीही गोष्ट साध्य करु शकते.
हो, सर्वसामान्याप्रमाणेच मलासुद्धा स्ट्रेस येतो. मला नवीन गोष्टी करायला आवडतात. माझ्या वडिलांनी मला कानमंत्र दिला होता की, 'बेहता पानी निर्मला'. जोपर्यंत पाण्याचा प्रवाह आहे तोपर्यंत ते स्वच्छ आहे. पण, जेव्हा त्या पाण्याचा प्रवाह थांबतो तेव्हा तिथे घाण साचू लागते. त्यामुळे काहीही झालं तरी आयुष्यात थांबू नकोस हा कानमंत्र मला माझ्या बाबांनी दिला. त्याच नादात मी अनेक काम करत गेले. तेव्हा आपसूकच ताण येतो. तेव्हा मी ध्यान करते. भजन ऐकते. माझाच्या महाकट्ट्यावर जया किशोरी यांनी हा कानमंत्र सांगितला.
राम मंदिर निर्माणाबाबत काय म्हणाल्या जया किशोरी?
पहिली गोष्ट म्हणजे जिथे इतक्या लोकांची श्रद्धा जोडली आहे त्यामागे काहीतरी कारण असेलच. दुसरी गोष्ट म्हणजे पर्यटन. आजच्या युगात तुमची संस्कृती पाहण्यासाठी लोक बाहेरुन आपल्या देशात येतात. त्याचबरोबर ज्या लोकांनी यासाठी त्याग केला आहे. त्यांच्यासाठी हा क्षण फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे राम मंदिराबाबत माझ्या मनात कायमच आदर आणि प्रेमभावना असेल.
जया किशोरी यांचं महाराष्ट्राशी आहे खास नातं
एबीपी माझ्याच्या महाकट्ट्यावर जया किशोरी यांनी आपलं बालपण उलगडलं. त्यांनी सांगितलं..माझं आजोळ महाराष्ट्रातलं आहे. माझी आई महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी इथली आहे. आई-वडिलांचं लग्न झाल्यानंतर मराठी संस्कृती आपसूकच घरात आली. मला बेसन भात, पोहे, उसळ, आलू बोंडा हे पदार्थ फार आवडतात.
लग्न करण्याचं योग्य वय कोणतं?
सध्याच्या काळात लग्नासारख्या विषयावर तरुणाई गंभीर होते, कधी विषय टाळते. मात्र, लग्न करण्याचं योग्य वय कोणतं या संदर्भात जया किशोरी यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, 'लग्न तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला करायची इच्छा असेल. कारण लग्न ही मोठी जबाबदारी आहे. त्यामध्ये प्रेम, आदर, भावना आणि वेळ देणं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही या गोष्टी करु शकत असाल तरच तुम्ही लग्न करण्याचा विचार करावा. अन्यथा समोरच्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करु नका.'
पाहा व्हिडीओ :