Holashtak 2025: होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यापूर्वी शुक्रवार, 7 मार्चपासून होलाष्टक सुरू झाले आहे, ज्याची समाप्ती 13 रोजी होलिका दहनाने होईल. हिंदू धर्मात होलाष्टकाचा काळ अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य न करण्याचा सल्ला दिला जातो. या कालावधीत विवाहसोहळा, उद्घाटन, जायवळ, गृहप्रवेश आणि इतर शुभ कार्ये प्रतिबंधित असतात. होलाष्टक नेमका काय आहे? त्याची परंपरा काय आहे? या काळात कोणते उपक्रम होतात? जाणून घेऊया.


होलाष्टकाची पौराणिक कथा जाणून घ्या


पौराणिक शिवपुराणातील कथेनुसार तारकासुर या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह होणे आवश्यक होते, कारण त्या राक्षसाचा वध फक्त शिवपुत्राच्या हातून होणार होता. परंतु देवी सतीच्या आत्मदहनानंतर भगवान शिव गहन तपश्चर्यामध्ये लीन झाले. भगवान शिवांना त्यांच्या तपश्चर्येतून जागृत करण्याची जबाबदारी देवतांनी कामदेव आणि देवी रती यांच्यावर सोपवली. कामदेव आणि रती यांनी भगवान शिवाची तपश्चर्या मोडली, त्यामुळे भगवान शिव अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला जाळून राख केले. ज्या दिवशी कामदेवाला भगवान शिवाने भस्म केले तो दिवस फाल्गुन शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी होता. भगवान शंकराच्या कोपाने घाबरलेल्या सर्व देवांनी क्षमा मागितली. भगवान शंकराची समजूत काढण्यासाठी सर्वांना आठ दिवस लागले. राग शांत झाल्यावर भगवान शिवाने कामदेवाला जिवंत होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे हे आठ दिवस अशुभ मानले जातात.


होलाष्टकाचे ज्योतिष आणि वैदिक महत्त्व


शास्त्रानुसार, होलाष्टकच्या आठ रात्रींना खूप महत्त्व आहे. या आठ रात्री केलेली साधना लवकर सफल होते. या रात्री तंत्र-मंत्राशी संबंधित लोक विशेष साधना करतात. होलाष्टकच्या आठ दिवसांच्या वेगवेगळ्या तिथींना वेगवेगळे ग्रह हिंसक स्थितीत राहतात, अशी ज्योतिष आणि वैदिक मान्यता आहे.


हेही वाचा>>


Zodiac Personality: चक्क 'सिंगल' राहून मिळवतात मोठं यश! 'या' 3 राशींचे लोक अविवाहित असल्यावर अधिक भाग्यवान ठरतात, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )