Hartalika Teej 2024 Muhurat : हिंदू पंचांगानुसार, आज हरतालिकेचा (Hartalika) व्रत आहे. देशातील अनेक भागांत हरतालिकेचे हे व्रत पाळले जाते. हरतालिकेतचं व्रत भगवान शंकर-माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकर (Lord Shiva) आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात.


हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मूर्तीची विधिवत पूजा करतात आणि उपवास धरतात. यंदा हरतालिकेचा शुभ मुहूर्त नेमका कधी ते जाणून घेऊयात. 


हरतालिका पूजा विधी (Hartalika Puja Vidhi 2024)


हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी. शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा. व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला सुरुवात करावी.


चौरंगावर रंगीत वस्त्र घाला, त्यावर कलश ठेवून बाजूला तांदूळ पसरवा. त्यावर पार्वतीची छोटी मातीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवा. गणपती बाप्पांचा फोटो ठेवून बाप्पाची पूजा देखील करावी, उपलब्ध फळं, फुलं अर्पण करावी. यावेळी शिव पार्वती मानून एका दांपत्याची देखील पूजा करावी. आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा द्यावी. स्त्रियांना हळदकुंकू आणि वान दान करावे.


हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य 


तुम्ही जर हरतालिकेची पूजा करणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडे काही वस्तूंची यादी असणं गरजेचं आहे. वाळू, बेलपत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरी फुलं, वस्त्र, सौभाग्याचं साहित्य, काजळ, कुंकू, चौरंग, रांगोळी, दूध, मध, पाण्याचा कलश, तूप, तेल, चंदन, शंख, घंटा, निरांजन, विड्याची पाने, तेलाच्या वाती, खडीसाखर,फळं, गूळ, खोबरं, समई, पंचामृत, उदबत्ती, अक्षता, कापूर, कोरे वस्त्र, पळी, पंचपात्र, हळद, कुंकू, ताम्हण तसेच फणी आणि आरसा यांसारखं साहित्य तुम्हाला लागणार आहे. 


'हा' असणार आहे हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त (Hartalika Puja Muhurta 2024)


पंचांगानुसार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:22 वाजता तृतीया तिथी सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी म्हणजेच (आज) पहाटे 03:01 वाजता समाप्त होईल. 6 सप्टेंबर रोजी उदय तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.01 ते 08.32 पर्यंत असेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Hartalika Teej 2024 : हरितालिकेच्या दिवशी 'या' 5 गोष्टींचे करा दान; महादेव-माता पार्वतीची सदैव राहील कृपा