Ganesh Visarjan 2025 : राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा (Ganesh Chaturthi 2025) सण अगदी जल्लोषात साजरा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. आज दहा दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे. भक्तांचा यथोचित पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावी परत जातील. यावेळी बाप्पाला निरोप देताना भावना दाटून येतात. अश्रू अनावर होतात. तसेच, गणपती बाप्पा मोरया. 'पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणत भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. मात्र, गणपती विसर्जनाच्या वेळी आणखी एक पूजा महत्त्वाची असते ती म्हणजे 'उत्तरपूजा'. ही उत्तरपूजा म्हणजे काय आणि ती करताना कोणती काळजी घ्यावी? याचा विधी काय असतो? या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.
उत्तरपूजा म्हणजे काय? (What is Uttarpuja)
गणपती आगमनाच्या दिवशी जशी प्राणप्रतिष्ठापना महत्त्वाची आहे. त्याच पद्धतीने गणपतीचं विसर्जन करताना उत्तरपूजा करणं गरजेचं आहे. गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करताना मूर्तीमध्ये प्राण घातले जातात. तर, उत्तरपूजा करताना मूर्तीतून प्राण काढला जातो. म्हणजेच त्या मूर्तीचं फक्त मूर्त स्वरुप राहतं. पण ही उत्तरपूजा कशी करावी ते जाणून घेऊयात.
गणपतीची उत्तरपूजा करण्याचा विधी 2025 (Ganesh Visarjan Vidhi 2025)
- गणपतीची उत्तरपूजा करताना सकाळी नेहमीप्रमाणे उठावे. तसेच, गणपतीची पंचोपचार पूजा करावी.
- त्यानंतर गणपतीला मोदक, लाडू किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
- गणपतीला नवीन वस्त्र अर्पण करावेत.
- यावेळी आचम्य : श्रीसिद्धिविनायकमहागणपतीप्रीत्यर्थं गंधादिपंचोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये । महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामिः । अक्षतां हरिद्रां कुंकुमं समर्पयामि। श्रीमहागणपतये नमः । सिंदूरंदूर्वांकुरान् कालोद्भवपुष्पाणिच समर्पयामि । या मंत्राचा जप करावा.
- तसेच, गणपतीला गंध, फुले, अक्षता, दुर्वा आणि हळद-कुंकू अर्पण करावेत.
- हे मंत्र म्हणून गणपतीला गंध, फुले, अक्षता, हळद कुंकू, दूर्वा, शेंदूर हे अर्पण करावे.
- श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि ।
- महागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।
- महागणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि ।
- वरील मंत्र म्हणून गणपतीला धूप, दीप ओवाळावा , नैवेद्य दाखवावा आणि कापूर लावून आरती करावी.
- पूजेच्या शेवटी दिलेले मंत्रपुष्प आणि प्रार्थनेचे मंत्र म्हणून एका कापडात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि काही पैसे ठेवावे. या सगळ्या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवावे.
- विसर्जनापूर्वी गणपतीची मनापासून आरती करावी आणि या काळात आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागावी. तसेच, पूजेचे साहित्य विसर्जित करावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :