Ganesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सर्वत्र गणपतीच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या गणपतीत काय काय करावं आणि काय काय नको, असं अनेकांना झालं आहे. गणेशोत्सव हा देशातील मोठा सण मानला जातो. देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. तरी गणपती आगमनाची वेळ आणि त्याबाबत काहींच्या मनात शंका असते. गणपती घरी नेमका कधी आणावा? या शंकांचं निराकरण शास्त्रात केलं आहे, याबद्दल जाणून घेऊया.


यंदा गणेशोत्सव कधी? (Ganeshotsav 2024 Date)


यंदाचा गणेशोत्सव 7 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणार आहे. तर 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशीला गणेशोत्सव संपेल. 17 सप्टेंबरला गणेश विसर्जन होईल.


गणपती घरी आणताना आलेल्या शंका आणि त्याचं निराकरण



  • श्रीगणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीच्या 8 ते 10 दिवस आधी घरी आणून ठेवता येते. ती आदल्या दिवशीच घरी आणावी असं नाही, तसेच मूर्ती बाजारातून घरी आणण्यासाठी दिवस पाहण्याची आवश्यकता नसते.

  • भाद्रपद महिन्यामधील पार्थिव गणेश स्थापना आणि पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ, मुहूर्त नाही. प्रातःकालापासून मध्यान्हापर्यंत (अंदाजे दु. 1:30 पर्यंत) कोणत्याही वेळी स्थापना आणि पूजन करता येतं.

  • उजव्या सोडेंचा गणपती कडक सोवळ्याचा आणि डाव्या सोडेंचा सौम्य अशी समजूत करुन घेणं चुकीचं आहे.

  • भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी श्री गणेश स्थापना/पूजन करणं शक्य झालं नाही तर त्यानंतर करु नये. एखाद्या वर्षी लोप झालेला चालेल.

  • गणपती स्थापना झाल्यावर अशौच आल्यास दुसऱ्याकडून लगेच गणपती विसर्जन करुन घ्यावं.

  • एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झालेले चालतील.

  • घरामध्ये गर्भवती असता गणेश मूर्तीचं विसर्जन करता येतं. अशा वेळेस मूर्ती विसर्जन न करण्याची रुढी गैरसमजुतीमुळे आहे.

  • प्राणप्रतिष्ठा करून बसवलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यांतून खाली काढतात आणि तिचं पाण्यात विसर्जन करतात.

  • वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं, असा नियम नसून पाण्यात विसर्जन करावं असा आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येतं. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणं आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी.

    (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


    हेही वाचा :




Ganesh Chaturthi 2024 Date : बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर; मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या