Diwali 2023 Date : दिवाळी (Diwali 2023) हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. या दिवशी संपूर्ण देश दिव्यांनी उजळून निघतो. दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. मात्र यंदा दिवाळीच्या नेमक्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींच्या मते 12 नोव्हेंबरला दिवाळी (Diwali 2023 Date) आहे, तर काहीजण 13 नोव्हेंबरला दिवाळीचा योग्य दिवस मानत आहेत. यात आता नेमकी दिवाळीची तारीख कोणती? लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


यंदा दिवाळी नेमकी कधी?


दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. या वर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथी 12 नोव्हेंबरला दुपारी 2:44 वाजता सुरू होत आहे. ही अमावस्या सोमवारी 13 नोव्हेंबरला दुपारी 2:56 वाजता संपेल. त्यामुळे दिवाळी 12 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळीच्या दिवशीच लक्ष्मीपूजन केले जाते. नरक चतुर्दशी देखील 12 नोव्हेंबरला आहे, त्याच दिवशी अभ्यंगस्नान (पहिली अंघोळ) असणार आहे.


दिवाळी पूजेसाठी शुभ मुहूर्त


यंदा दिवाळीची पूजा 12 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त 12 नोव्हेंबरला सायंकाळी 5.40 ते 7.36 पर्यंत आहे, लक्ष्मी-गणेशाच्या पूजेचा हा शुभ मुहूर्त आहे. ज्योतिषांच्या मते, या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी येते.


वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत सर्व तारखा



  • 9 नोव्हेंबर - वसुबारस

  • 10 नोव्हेंबर - धनत्रयोदशी

  • 11 नोव्हेंबर - मासिक शिवरात्री

  • 12 नोव्हेंबर - दिवाळी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, अभ्यंगस्नान (पहिली अंघोळ)

  • 13 नोव्हेंबर - सोमवती अमावस्या

  • 14 नोव्हेंबर - दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा, गोवर्धन पूजन, अन्नकुट

  • 15 नोव्हेंबर - भाऊबीज


दिवाळीचं धार्मिक महत्त्व


दिवाळीच्या रात्री गणपती आणि लक्ष्मी देवीच्या नव्या मूर्तींची पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी-गणेश व्यतिरिक्त कुबेर देवता आणि बहि-कटाची पूजा करण्याची परंपरा आहे. असं मानलं जातं की, दिवाळीच्या रात्री पूजा केल्याने आयुष्यात कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही. 


का साजरी केली जाते दिवाळी?


दिवाळी (Diwali 2023) हा सण दरवर्षी अमावस्येच्या काळ्या रात्री साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतं. त्यामुळे हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. दिवाळीच्या दिवशी लंकापती रावणाचा पराभव करून भगवान श्रीराम अयोध्येला परतले होते, असंही मानलं जातं. 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामाच्या पुनरागमनाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अयोध्यावासियांनी संपूर्ण अयोध्या दिव्यांनी सजवली होती. तेव्हापासून देशभरात दिवाळी साजरी केली जाते.


हेही वाचा:


Shani Margi 2023: 140 दिवसांनंतर 'शनि'ची पिडा होणार कमी; 'या' राशींना होणार धनलाभ