Dhanteras 2025 : धनत्रयोदशी (Dhanteras 2025) हा सण या वेळी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो, याला 'धनतेरस' असेही म्हणतात. पुराणांमध्ये या सणाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. त्यापैकी प्रमुख कथा आणि महत्त्व खालीलप्रमाणे आहेत.
भगवान धन्वंतरीचा जन्म :
समुद्रमंथनातून 14 रत्ने बाहेर पडली, त्यापैकी एक म्हणजे भगवान धन्वंतरी. धनत्रयोदशीच्या दिवशीच धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. धन्वंतरी हे देवांचे वैद्य आणि आयुर्वेदाचे जनक मानले जातात. म्हणून या दिवसाला 'धन्वंतरी जयंती' असेही म्हणतात आणि त्यांची पूजा केल्याने आरोग्य लाभते आणि दीर्घायुष्य मिळते.
देवी लक्ष्मीचे प्रकटीकरण :
समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीदेखील याच दिवशी प्रकट झाली, त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केल्याने घरात धन, सुख आणि समृद्धी येते.
यमदीपदान (अपमृत्यू टळणे) :
हेम नावाच्या राजाच्या पुत्राला 16 व्या वर्षी सर्पदंशाने मृत्यू येणार असल्याची भविष्यवाणी होती. त्याच्या पत्नीने चौथ्या रात्री संपूर्ण शयनगृहात दिवे लावले आणि सोन्या-चांदीच्या मोहरा व दागिने प्रवेशद्वारावर ठेवले. यमराज जेव्हा सर्परूपात आले, तेव्हा दिव्यांच्या आणि दागिन्यांच्या तेजाने त्यांचे डोळे दिपले आणि त्यांना राजपुत्र दिसला नाही, त्यामुळे ते परत गेले. अशा प्रकारे राजपुत्राचे प्राण वाचले. याच कारणामुळे धनत्रयोदशीच्या रात्री यमराजासाठी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा (यमदीप) लावला जातो, याला 'यमदीपदान' म्हणतात. यामुळे अपमृत्यू टळतो, अशी श्रद्धा आहे.
धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू उधार देऊ नयेत?
असे मानले जाते की, धनत्रयोदशीच्या दिवशी (विशेषतः संध्याकाळच्या वेळी) काही वस्तू उधार (उसने) देणे टाळावे, कारण असे केल्याने घरातील समृद्धी कमी होऊ शकते:
पैसे / धन (कर्ज देणे-घेणे) : या दिवशी धन उधार देणे किंवा कर्ज घेणे टाळावे. हा दिवस धनाची वृद्धी करणारा मानला जातो, त्यामुळे या दिवशी उधार दिल्यास तुमच्याकडील लक्ष्मी बाहेर जाते, असे मानले जाते.
साखर : साखर देवी लक्ष्मीशी संबंधित मानली जाते, त्यामुळे या दिवशी साखर कोणालाही उधार देऊ नये.
मीठ : मीठ हे समुद्राचे उत्पादन असून त्याचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी मीठ उधार दिल्यास घराच्या समृद्धीला बाधा येऊ शकते.
दूध, दही, तेल : यांसारख्या वस्तू उधार देणे टाळावे.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हेही वाचा :