Manache Shloka In School Syllabus : शालेय अभ्यासक्रमात  मनाचे श्लोक, मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा विचार एससीईआरटी (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) करत असल्याची चर्चा आहे. सध्या या मुद्द्यावरुन बरीच चर्चा होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे. सध्या  मनाचे श्लोक, मनुस्मृतीतील श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यावरुन बरेच वाद देखील सुरू आहेत, अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.


देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं काय?


शालेय अभ्यासक्रमावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "मनाचे श्लोक महाराष्ट्रात वर्षानुवर्षे बोलले जातात, म्हटले जातात आणि ऐकले जातात. हे श्लोक अभ्यासक्रमात आहेत की नाही माहिती नाही, हे मी तपासलं नाही. पण विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य नाही"


अभ्यासक्रमात खरंच बदल होणार?


राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीतेचा (Bhagavad Gita) समावेश करण्याचा विचार केला आहे. यावरुन आता अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहे. अनेक जण याला पाठिंबा दर्शवत आहे, तर अनेकांनी विरोध दर्शवला आहे.


मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचाही विचार


स्वभाववृत्ती आणि मुल्ये या घटकांची ओळख करुन देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा विचार देखील एससीईआरटी (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने  राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत.


राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य


मराठी माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमांमध्येही मराठी भाषा शिकवणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, अभ्यासक्रम आराखड्यात अद्यापही त्याबाबत स्पष्ट तरतूद नाही. मराठी व्यतिरिक्त इतर भाषा माध्यमांच्या शाळांमधील भाषा निवडीचे पर्याय कसे असावेत, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.


महाराष्ट्र राज्यात इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, पंजाबी, सिंधी, तामिळ माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये स्थानिक भाषा मराठी असल्याने तीच प्राथमिक भाषा करायला हवी होती. परंतु, या बाबतीत अद्यापही कोणत्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाही.


हेही वाचा:


Bhagavad Gita : आता शाळेत शिकवली जाणार भगवद्गीता; अभ्यासक्रमात होणार समाविष्ट, आता मुलांना मनाचे श्लोक देखील होणार तोंडपाठ