Pandharpur : यंदा आषाढी एकादशीला पंढरपूरला (Pandharpur) जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून आनंदाची बातमी आहे. यंदा आषाढी यात्रेनिमित्त भाविकांसाठी एसटीने विशेष गाड्यांचं नियोजन केलं आहे. एसटीने आषाढी यात्रा काळात 5 हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. यंदा राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा जास्त भाविक असतील तर त्यांनी मागणी केल्यास थेट त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.
एका गावातून 40 पेक्षा अधिक भाविक असल्यास गावातून थेट एसटी
सालाबाद प्रमाणे श्री श्रेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींसोबत चालत दिंडीने येतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. 40 पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ज्येष्ठांना आणि महिलांना एसटी प्रवासात विशेष सूट
अर्थात या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. दरम्यान, मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त 4 हजार 245 विशेष बसेस सोडल्या होत्या. यात्रा काळामध्ये 18 लाख 30 हजार 934 भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती.
फुकटया प्रवाशांना लगाम
यात्रा काळात गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणं, वाहकाकडून तिकीट मागून न घेणं, अशा प्रकारे फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचं नियोजन केलं आहे. अशा फुकटया प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे 200 सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी यात्रा काळात 24 तास नजर ठेवून असणार आहेत.
वाहतुकीच्या नियोजनासाठी एसटीची मदत
एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात. अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो. यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून 36 पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे.
चार तात्पुरती बस स्थानकं उभारणार
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी एकाच स्थानकावर होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानकं उभारण्यात येणार आहेत.
बस स्थानकाचे नाव | जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस |
चंद्रभागा बसस्थानक | मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग आणि पंढरपूर आगार |
भिमा यात्रा देगाव | छत्रपती संभाजी नगर, नागपूर आणि अमरावती प्रदेश |
विठ्ठल कारखाना | नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर |
पांडुरंग बसस्थानक | सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग |
हेही वाचा: