Akshaya Tritiya 2024 : वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2024) साजरी केली जाते. यावर्षी अक्षय्य तृतीया 10 मे रोजी, म्हणजेच शुक्रवारी आहे. असं म्हटलं जातं की, या दिवशी केलेली सर्व कामं फलदायी ठरतात. या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं तर त्याचं शुभ फळ अनेक जन्मांपर्यंत मिळत राहतं. परंतु, या दिवशी काही कामं करणं निषिद्ध मानलं जातं.


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अशुभ कामं केल्यास अनेक जन्म दारिद्र्य आपल्या मागे लागतं आणि व्यक्ती गरिबीच्या खाईत लोटली जाते. हे सगळं टाळायचं असल्यास अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? जाणून घेऊया.


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका



  • अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मांस आणि मद्याचं सेवन करू नये. असं करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, पैशाशी संबंधित समस्या तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकतात.

  • अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणी तुमच्या दारात आले तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका, कारण त्या दिवशी हे शुभ लक्षण मानलं जात नाही.

  • अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. तुमच्या कुटुंबातील व्यक्तीसाठी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी अपशब्द वापरू नका. विशेषत: आपल्या आईचा आणि शिक्षकांचा अजिबात अपमान करू नका.

  • अक्षय्य तृतीयेच्या कोणाकडूनही कर्ज किंवा उधारी घेऊ नका. असं केल्याने आर्थिक समृद्धी ऐवजी दारिद्र्य तुमच्या नशिबी येतं आणि तुमचे वाईट दिवस सुरू होतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गरजूंना मदत करायला हवी, यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.


गरजूंना दान करा


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होतं. या दिवशी दानाला आणि तीर्थ स्नानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर पितरांत्या नावाने श्राद्ध केलं तर त्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने चांगलं पुण्य मिळतं, तसेच पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. 


पवित्र नद्यांमध्ये स्नान करा


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी इतर गोष्टींबरोबरच गंगा नदी किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. स्नान केल्यावर तुम्ही गरीब व्यक्तीला दान केलं पाहिजे, यामुळे तुम्हाला फलप्राप्ती होते. तसेच, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश देखील मिळतं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया अवघ्या 2 दिवसांवर; सोन्याऐवजी राशीनुसार खरेदी करा 'या' वस्तू, घरात होईल पैशांची बरकत