Yavatmal News : यवतमाळच्या (Yavatmal) मारेगाव तालुक्यात भाऊबिजेच्या पूर्वसंध्येला एका अल्पभूधारक शेतकऱ्याने (Farmer) विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळले. विष प्राशन केल्यानंतर मृत्यूपूर्वी तो आपल्या मुलांशी आणि पत्नीशी व्हिडीओ कॉलवर अखेरचा बोलला आणि त्याने जीव सोडला. सचिन विठ्ठल ढोरे (वय 37 वर्षे रा.चोपण) असे अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (25 ऑक्टोबर) रात्री साडे अकराच्या सुमारास उघडकीस आली. 


सचिन ढोरे यांच्याकडे पाच एकर पेक्षा कमी शेती आहे. यावरच कुटुंबाचा गाडा हाकत असताना अतिवृष्टीने उभी पिके मातीमोल झाली. या विवंचनेत असताना शासनाची मदतीची घोषणाही दिवाळीसारख्या सणात पदरी पडली नाही. त्यामुळे दिवाळी सारखा सण अंधकारमय त्याच्या वाट्याला आला. त्यामुळे आता कसे कसे जगावे असा प्रश्न त्याच्या समोर होता.


25 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी तो शेतात गेला. सायंकाळी विष प्राशन केल्यानंतर त्याने पत्नीला व्हिडीओ कॉल केला. मला मुलांशी अखेरचे बोलायचे आहे, त्यांचा चेहरा बघायचा आहे, असं त्याने सांगितलं. त्याच्या या वक्तव्याने पत्नी काही क्षण हादरली. मात्र तो चेष्टा करत असावा, असं तिने मोबाईल फोन मुलांकडे दिला. यानंतर सचिनने मुलांशी बोलली आणि फोन बंद करुन जगाचा निरोप घेतला.


नापिकी आणि कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून भंडाऱ्यात शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं
सततच्या नापिकीला कंटाळून तसेच मित्र मंडळीकडून व पत संस्था, बँक आणि सोसायटीतून घेतलेले कर्ज कसे परतफेड करायचे या विवंचनेतून 55 वर्षीय शेतकऱ्याने गावातीलच ग्रामपंचायतजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तर्री मिन्सी येथे घडली आहे. राजेंद्र वासुदेव शांतलवार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली आहे.


औरंगाबादमध्ये नुकसानीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
औरंगाबादमधील शेतकऱ्याने ऐन दिवाळीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून आत्महत्या केली होती. कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात रविवारी (23 ऑक्टोबर) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. पंडित एकनाथ निकम (वय 47 वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. सतत पडत असलेल्या पावसाने पिके मातीमोल झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या पंडित यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन मृत्युला कवटाळले.