Wheat Prices : सध्या देशात गव्हाच्या किंमतीत (Wheat prices) वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात गव्हाच्या किंमती चार टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या हंगामात गव्हाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशात गव्हाचा पुरेसा साठा असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (Department of Food and Public Distribution) दिली आहे. भारत गहू आयात करणार असल्याचे वृत्त केंद्र सरकारनं फेटाळून लावलं आहे. देशांतर्गत गरज आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी गव्हाचा पुरेसा साठा शिल्ल्क असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.


गव्हाच्या किंमती 24 ते 25 रुपये किलोवर 
 
दरम्यान, मिल ग्रेड गव्हाच्या किंमती गेल्या आठवड्यात एक रुपये किलोने वाढल्या आहेत. उत्तर भारतात गव्हाच्या किंमती 24 रुपये किलो ते 25.50 रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. दरम्यान, गव्हाच्या प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्याचा परिणाम गव्हाच्या पिकावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळं गव्हाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या हंगामात गव्हाची मागणी वाढणार आहे. सणासुदीच्या हंगामात ग्राहक मोठ्या प्रमाणावर गव्हाची खरेदी करत असतात.  10 सप्टेंबरपासून खरेदी सुरु होण्याची शक्यता असल्यानं, किंमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.


 2021-22 गव्हाचे उत्पादन 106.84 दशलक्ष टन 


या महिन्यात जारी केलेल्या चौथ्या आगाऊ अंदाजानुसार, सरकारने 2021-22 गव्हाचे उत्पादन 106.84 दशलक्ष टन केले आहे. तथापी, व्यापारातील एक मोठा वर्ग या आकडेवारीवर विश्वास ठेवत नाही. सरकार सांगत असलेला पीक आकडा खूप जास्त आहे. तो जुळत नाही. जर सरकारी आकडे बरोबर असतील, तर बाजारात या भावात गव्हाची खरेदी-विक्री का होत आहे? तो खूपच कमी असायला हवा, अशी माहिती देखील व्यापाऱ्यांनी दिली आहे. व्यापार आणि उद्योगांचा असा अंदाज आहे की भारताचे 2021-22 गव्हाचे उत्पादन हे 90 दशलक्ष टन ते 94 दशलक्ष टन दरम्यान असू शकते. मागणी आणि पुरवठा यांच्यात फरक असल्याने भारतातील गव्हाच्या किंमती वाढत असल्याची माहिती गहू निर्यातदारांनी दिली आहे.


उष्णतेच्या लाटेचा देखील गव्हाच्या उत्पादनावर परिणाम


उष्णतेच्या लाटेचा देखील गव्हाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. भारताने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर आटा आणि मैदा यासारख्या गहू उत्पादनांच्या निर्यातीवर निर्बंध आणले होते. ज्यामुळे किंमती तात्पुरत्या खाली आल्या होत्या. मात्र, आता गव्हाच्या किंमतीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की गव्हावर आयात शुल्क शून्य करणे नजीकच्या भविष्यात उपयुक्त ठरणार नाही. कारण देशांतर्गत किंमती आयात केलेल्या गव्हाच्या किंमतीपेक्षा खूप जास्त आहेत. दुसरीकडे जागतिक स्तरावर, गव्हाच्या किंमती कमी होऊ लागल्या आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: