Pune SP College News: पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या (SP College) आवारात मोठी दुर्घटना (Accident) घडली आहे. अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मालसिंग पवार असं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. झाडं कापायला गेले असता ही दुर्घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स. प. महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या वसतीगृहाच्या परिसरात वाढलेले गवत कापण्यासाठी पवार गेले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या अंगावर झाड कोसळलं. झाडाच्या काही फांद्या त्यांच्या अंगावर कोसळल्या यात ते जखमी गंभीर झाले. त्यानंतर महाविद्यालयातील काही व्यक्तींनी त्यांना दवाखान्यात दाखल केलं. त्यांच्यावर काही तास उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


पवार हे मुळचे सोलापूरचे आहेत. स. प. महाविद्यालयात ते अनेक वर्षांपासून काम करत होते. महाविद्यालयाच्या परिसरात अनेक मोठी झाडे आहेत. त्यांच्याकडे महाविद्यालयातील मुलांच्या वसतीगृहाच्याजवळ असलेलं गवत कापण्याचं काम दिलं होतं. सकाळच्या वेळी त्यांनी रोजच्या सारखी गवत कापायला सुरुवात केली. मात्र अचानक त्यांच्या अंगावर झाड कोसळलं. 


तीन महिन्यात 100 हून अधिक झाड पडल्याच्या घटना
सध्या पुणे शहरात झाड पडल्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. रोज किमान शहरात दोन किंवा तीन झाड पडल्याच्या घटना होतात. यात नागरीकांचं काही प्रमाणात नुकसानदेखील होतं. मागील तीन महिन्यात झाड पडल्याने पुणे शहरात दोन मृत्यू झाले आहेत. त्याच बरोबर मागील तीन महिन्यात वेगवेगळ्या परिसरात झाड पडल्याच्या शंभराहून अधिक घटना समोर आल्या आहे, अशी माहिती अग्निशमनदलाने दिली आहे.  


या परिसरात जास्त प्रमाणात झाड पडल्याच्या घटना
पर्वती शाहू कॉलनी, जीपीओ, पोलिस आयुक्तालय,भवानी पेठ बीएसएनएल ऑफिस, प्रभात रोड, औंध आंबेडकर चौक, राजभवन जवळ, गुरुवार पेठ पंचहौद, कोंढवा शिवनेरी नगर, एनआयबीएम रोड, काञज कोंढवा रोड, नवी पेठ पञकार भवन, राजेन्द्र नगर, पर्वती स्टेट बँक कॉलनी, एसटी कॉलनी स्वारगेट , कोंढवा आनंदपुरा हॉस्पिटल या सगळ्या परिसरात झाडे पडण्याच्या तक्रारी सातत्याने येतात.


जीवित हानी होण्याचा घटना कमी
झाड पडल्यामुळे अनेकदा गाड्यांचं नुकसान होतं. मात्र जीवित हानीचं प्रमाण फार कमी आहे. मागील तीन महिन्यात आतापर्यंत झाड पडल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र नागरीकांचं बाकी नुकसान प्रचंड प्रमाणात झालं आहे.