Wardha  News : हरभरा खरेदीत (Gram Purchase) एका व्यापाऱ्याची तब्बल 24 लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली. अकोल्यातील (Akola) दलालाने हिंगणघाटच्या व्यापाऱ्याला गंडा घातला आहे. हरभरा खरेदी केल्यानंतर खरेदीची 24 लाख रुपयांची रक्कम दिली नसल्यानं व्यापाऱ्याने पोलिसात (Police) धाव घेतली.  या प्रकरणी अकोला येथील दलाल मनीष जैन याला अटक केली असून, यातील दोन आरोपी फरार आहेत.


व्यापाऱ्याने 500 क्विंटल हरभरा दलाल मनीष जैनला विकला होता


दरम्यान, अकोला येथे याच दलालाने कोट्यवधींची फसवणूक केली असल्याची बाब देखील समोर आली आहे. पोलिसांच्या सखोल तपासात आणखी मोठे घबाड उघड होण्याची शक्यता आहे. हिंगणघाट येथील व्यापारी अभय ओस्तवाल यांनी 500 क्विंटल हरभरा मनीष जैन या दलालाला विकला होता.  हा हरभऱ्याने भरलेला ट्रक अकोला येथे पाठविण्यात आला होता. पण ज्या महानंद कृषी उद्योग डाळ मिलला हरभरा विकला तिथे ट्रक न उतरवता अकोला येथील शैलेश उद्योग या वेगळ्याच ठिकाणी हरभरा उतरवण्यात आला. त्यामुळं ट्रक चालकाला संशय आला. व्यापाऱ्याला या हरभरा खरेदीची रक्कम मिळालीच नाही. त्यानंतर व्यापारी अभय ओस्तवाल यांनी अकोला येथे पोहोचून हरभरा खरेदीची रक्कम द्या अन्यथा हरभरा परत करा अशी मागणी केली. त्यावर दलाल मनीष जैन, शैलेश उद्योगचे नरेंद्र भाला आणि महानंदा कंपनीच्या मालकाने हात वर केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेतली.


मनीष जैन या दलालाला हिंगणघाट पोलिसांनी केली अटक


दरम्यान, अशाच प्रकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक अकोला जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांची झाली असल्याचे अभय ओस्तवाल या व्यापाऱ्याने सांगितले आहे. मनीष जैन या दलालाला हिंगणघाट पोलिसांनी अकोला येथून अटक केली आहे. तर इतर दोघेजण फरार आहेत. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष जैन याला दोन दिवसांचा पीसीआर मिळाला आहे.


अद्याप दोन आरोपी फरार 


तीन जणांनी मिळून माझी फसवणूक केल्याची माहिती व्यापारी अभय ओस्तवाल यांनी दिली. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दलाल मनिष जैनला पोलिसांनी अटक केली आहे. तर या घटनेतील आणखी दोन जण फरार असल्याची माहिती व्यापारी अभय ओस्तवाल यांनी दिली. माझ्याबरोबरच अनेक लोकांची यामध्ये फसवणूक झाली आहे. सर्वांची मिळून जवळपास 20 कोटी रुपयांच्या आसपास फसवणूक झाल्याते ओस्तवाल म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : नंदुरबारमध्ये नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांची पाठ, बाजार समितीत आवक वाढली