Vegetable Price Hike : महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात दूध, तेल यांसारख्या वस्तूंचे दर वाढलेले पाहायला मिळत असताना आता भाज्याचे दरही गगनाला भिडले आहेत. भाज्यांचे दर आवाक्याबाहेर पोहोचले आहेत. भाजीपाल्यांच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याने गृहिणींचं बजेट आणखी कोलमडणार आहे.


भाजीपालाच्या दरात 20 ते 25 टक्क्यांची वाढ


आठवड्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या भाज्या पूर्णपणे खराब झाल्या. त्यामुळे भाज्यांचे दर देखील कडाडले आहेत. भाज्यांची आवक 25 ते 30 टक्क्यांनी घटल्याचं चित्र आहे. परिणामी, भाजीपालाच्या दरात 20 ते 25 टक्क्यांची वाढ बघायला मिळते आहे. बाजारात भाजीपाल्यांची आवक सुरळीत व्हायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सर्वसामान्यांना भाजीपाला चढ्या दराने घ्यावा लागणार आहे. 


दादरच्या भाजी मंडईतील आजचे भाज्यांचे दर


गव्हार - 100 रुपये प्रति किलो 
फुलकोबी - 60 रुपये प्रति किलो 
फ्लावर - 60 रुपये प्रति किलो 
पालक - 60 रुपये प्रति किलो 
शेपू - 50 रुपये प्रति किलो 
बीट - 60 रुपये प्रति किलो 
कोथिंबीर - 40 रुपये गड्डी
कांदा पात - 20 रुपये गड्डी


परतीच्या पावसाचा तडाखा


लांबलेल्या अनेक भागात पावसाने भाजीपाल्याची नासाडी केली. यामुळे शेतमालाची आवक देखील बाधित झाली आहे. नियमित होत असेल्या आवकेच्या तुलनेत अवघी 50 ते 60 टक्के आवक सध्या सुरू असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडलेले आहेत. परतीच्या पावसानं राज्यात थैमान घातलं होतं, याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.


परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे तसंच उपनगरांत भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील पुणे, नाशिक जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांत झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई-ठाणे आणि पुण्यात  भेंडी, गवार, शिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, वांगी, फरसबी अशा सर्वच भाज्यांचे दर कडाडले आहेत. सध्या बाजारात उत्तम दर्जाच्या भाज्या केवळ 25 टक्केच येत असल्याची माहिती समोर आली आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 400 ते 450 भाज्यांच्या गाड्या दाखल होत आहेत, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली.