Raju Shetti : चीनी बनावटीच्या प्लॅस्टीक कृत्रिम फुलामुळं (Plastic artificial flowers) देशातील फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. देशातील बाजारपेठेत चीनी बनावटीच्या प्लॅस्टीक फुलांची आयात वाढली आहे. या आयातीमुळं पुन्हा एकदा देशातील  फुलशेतीचा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं चीनी कृत्रिम प्लॅस्टीक फुलांच्या वापरावर आणि आयातीवर तातडीनं बंदी घालावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. याबाबत राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांच्याकडे निवेदन दिलं आहे. एकीकडे चीनचे आक्रमण वाढले म्हणता आणि दुसरीकडे चीनी प्लॅस्टिक कृत्रिम फुलांची आयात का करता असा सवालही शेट्टी यांनी केला आहे.


देशातील फुलशेतीचा व्यवसाय तोट्यात 


लॅाकडाऊनच्या संकटानंतर देशातील फुलाचा बाजार स्थिर स्थावर होण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच आता देशात चीनी बनावटीच्या प्लॅस्टीक कृत्रिम फुलांची आयात वाढली आहे. त्याचा परिणाम देशातील फुल उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. पुन्हा एकदा देशातील  फुलशेतीचा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे. त्यामुळं राजू शेट्टींनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारने चीनी कृत्रिम प्लॅस्टीक फुलांच्या आयातीवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी केली आहे.


लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चीनी कृत्रिम फुलांचा वापर


दरम्यान, राजू शेट्टींच्या या मागणीनंतर एबीपी माझाने त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी चीनी बनावटीच्या प्लॅस्टीक कृत्रिम फुलांच्या बाबतीत सविस्तर माहिती दिली. लग्न समारंभामध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर या चीनी कृत्रिम फुलांची सजावट केली जाते. अलिकडच्या काळात घरांमध्ये सुद्धा असा कृत्रिम फुलांचा वापर होत असल्याचे दिसत आहे. घरातील कुंड्या, सजावटीच्या वस्तू यासाठी या फुलांचा वापर केला जात  असल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली. याचा विपरीत परिणाम मार्केटवर होत आहे. फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलांच्या मागणीवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात सभा, समारंभ, कार्यक्रम बंद होतो, याचा मोठा फटका फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. फुलांची विक्री त्या काळात होत नव्हती. आता कुठेतरी मार्केट ओपन झालं आहे तर चीनी कृत्रिम फुलांची आयात वाढली आहे, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे शेट्टी म्हणाले.


चीनचे आक्रमण वाढले म्हणता आणि दुसरीकडे चीनी प्लॅस्टिक कृत्रिम फुलांची आयात करता


एकीकडे प्लॅस्टीकवर बंदी असताना दुसरकीकडे सरकार प्लॅस्टिक फुलांची आयात करत आहे. बंदी असताना आयात का करता? असा सवालही शेट्टी यांनी केला. ही फुलं खरेदी नाही केलं तर बंद काही पडत नाही. चीनचे आक्रमण वाढले म्हणता आणि दुसरीकडे त्यांची  चीनी प्लॅस्टिक कृत्रिम फुलांची आयात का करता? असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केला आहे. याबाबत मंत्री भुपेंद्र यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबत विचार करु असे त्यांनी सांगितल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. केंद्र सरकारने लक्ष नाही दिले तर मी राज्य सरकारकडे देखील मागणी करणार आहे. सध्या मी देशासाठी आयात बंदी करावी अशी मागणी केली आहे. मात्र, केंद्र सरकारने लक्ष नाही दिले तर राज्यात तरी बंदी घालण्यात यावी अशी राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती यावेळी राजू शेट्टी यांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या:


हिंगोलीच्या शेतकऱ्याचा नाद खुळा; कुलरचा गारवा देत जरबेरा फुल शेतीचे उत्पादन