Raju Shetti : चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे. या फुलांमुळे देशातील फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे राजू शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे.
याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी तातडीने पर्यावरण खात्याचे अतिरिक्त सचिव नरेश पाल गंगवार व सहसचिव सत्येंद्रकुमार यांना याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सुतोवाच केले आहेत.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोना लॅाकडाऊन संकटानंतर देशाच्या बाजारपेठेत स्थिर स्थावर होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या फुल उत्पादकांचा चीनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीने व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे. त्यामुळे चायनीज प्लास्टिक फुले वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घालण्यात यावी.
गेल्या दोन वर्षात कोरोना लॅाकडाऊन आणि चायनीज प्लास्टिक फुलांच्या आयातीने देशांतर्गत बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू ,अॅस्टर, शेवंती, गॅलार्डिया इत्यादी सुट्या फुलांना व लॅडओलस, गुलाब, जरबेरा, कानेंशन, ऑर्केड्स, अॅन्थुरियम या दांड्याच्या फुलांना प्रचंड मागणी असते. मात्र ही सर्व फुले चीनमधून प्लॅस्टिक स्वरूपात आयात झालेली आहेत व त्याचाच वापर केला जात आहे. याचा सर्वाधिक फटका देशातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसून बाजारात फुलांचे दर गडगडले आहेत.
फुलशेती करण्यासाठी फुल उत्पादक शेतकऱ्यांना सेड नेट ऊभे करण्यासाठी एकरी 10 ते 15 लाख, तर ग्रीन हाऊस ऊभे करण्यासाठी एकरी 70 ते 75 लाख रूपये इतका खर्च येतो. सरकारकडून मिळणारे अनुदानही तुटपुंजे असून या कर्जाचा सर्व बोजा शेतकऱ्यांवर पडत असल्याकडे राजू शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या