Yavatmal Farmers News : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतीकामांना वेग आला आहे. शेतकरी खरीपाच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करत आहेत. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातही शेतीकामांना वेग आला आहे. 'एक दिवस बळीराजासोबत' या अभियानांतर्गत यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  कळंब आणि राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप केले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यावर योग्य उपाययोजना करण्याचे आदेश देखील यंत्रणेला दिले आहेत.


पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी पेरणीची तयारी करत आहेत. त्या पार्श्वभूमीव जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप केले. तसेच त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी कळंब तालुक्यातील तासलोट, मेटिखेडा आणि डोंगरखर्डा तसेच राळेगाव तालुक्यातील सावंगी (पेरका), बुजरी, वटखेड या गावांना भेट दिल्या. तासलोट येथे पाणी फाऊंडेशन वाटर कप अंतर्गत झालेल्या जलसंधारण कामाची पाहणी देखली जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तेथील उर्वरित क्षेत्रात जलसंधारणाची कामं मनरेगा अंतर्गत घेण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. मेटिखेडा आणि बुजरी येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसाच्या नोंदी तातडीनं घेण्याचे तसेच त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याबाबत निर्देशही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. यावेळी  लाभार्थ्यांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले.




जिल्हाधिकाऱ्यांनी कळंब तहसील कार्यालय येथे सर्व तालुका विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. तसेच पोकरा, जलजिवन मिशन, घरकुल योजना, मातोश्री पांदन रस्ता, पोटखराब वर्ग-अ कामकाज, कर्ज वाटपाबाबत आढावा यावेळी घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसिलदार सुनिल चव्हाण कळंब, रविंद्र कानडे राळेगाव उपस्थित होते.


राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हेजरी लावली आहे. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.