अहमदनगर : युक्रेन आणि रशियातील युद्धाचा परिणाम गव्हाच्या दरामध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसात अहमदनगरच्या भुसार बाजारात गव्हाचा दरात 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी नगरच्या बाजारात गव्हाला 1900 रुपये प्रति क्विंटल दर होता. तर आज चांगल्या प्रतीच्या गव्हाला 2200 ते 2400 रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. 


रशिया जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. भारतात देखील रशियातून मोठ्या प्रमाणावर गहू आयात केला जातो.  मात्र , युद्धामुळे गव्हाची आवक बंद असल्याने तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात काही भागात अवकाळी पावसाने गव्हाची नासाडी झाल्याने बाजारात गव्हाची आवक घटली आहे, त्यामुळे गव्हाचे दर वधारले आहेत.


नवीन गहू बाजारात येण्यास किमान महिनाभराचा वेळ असल्याने गव्हाचे दर वाढले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गव्हाची निर्यात वाढून गव्हाचे दर आणखी वाढू शकतात अशी शेतकऱ्यांची धारणा असल्याने शेतकरी देखील बाजारात गहू आणत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे येत्या काळात गहू आणखी भाव खाऊन जाण्याची शक्यता आहे.


घरगुती मसाले तयार करण्याच्या हंगामात मिरचीचे दर गगनाला


यंदा मिरचीमुळे चांगलाच ठसका लागण्याची शक्यता आहे. कारण मिरचीचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला झोंबण्याची शक्यता आहे. यंदा किलोमागे मिरची 50 ते 100 रुपयांनी महाग  झाली आहे. मिरचीवर आलेली रोगराई आणि त्यात अवकाळी पावसाचा फटका याचा विपरीत परिणाम झाल्यानं यंदा मिरचीचं उत्पादन घटलंय परिणामी मिरची महाग झालेली आहे. सध्या मिरचीप्रमाणे इतर मसाला पिकंही महागली आहे.


निवडणुका संपल्यानंतर महागाई वाढण्याची शक्यता 


देशांतर्गत बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशसह अनेक प्रमुख राज्यांतील निवडणुकांमुळे किमती वाढवल्या नाहीत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा संपल्यानंतर आता सरकार किमती वाढवण्याचे पाऊल उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही लोक किमती वाढण्याची भीतीने पेट्रोल, डिझेलचा साठा करत आहेत. 


संबंधित बातम्या : 


Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धाचा भारतीयांना फटका; 'या' गोष्टी महागण्याची शक्यता, खाद्यतेलाचा साठा करण्यात गुंतले लोक