Monsoon : देशातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे.
यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. त्यामुळे सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे.
दरम्यान, जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केला आहे. हा पहिला अंदाज आहे. हा अंदाज शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता घेऊन आला आहे. एकूण पावसाच्या 74 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. पाऊसमान चांगला होण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण गेले दोन वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली होते. आता थोडासा धोका कमी झाला आहे. तसेच वाढत असलेली महागाई, वाढते तापमान, अशातच पाऊसमान चांगला होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे.
मागील दोन दिवसापूर्वीच हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने देशभरातील यंदाच्या मान्सूनचा अंदाज जारी केला होता. यंदा मान्सून सामान्य राहिल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. या अंदाजानुसार देशभरात मान्सून (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या 98 टक्के राहण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेन वर्तवली होती. यात पाच टक्क्यांपेक्षा कमी किंवा जास्त एरर मार्जिन आहे. स्कायमेटने यापूर्वी 21 फेब्रुवारी रोजी मान्सूनचा अंदाज जारी केला होता, ज्यामध्ये यावर्षी मान्सून सामान्य असेल असं सांगितलं होतं.
दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मान्सून महत्त्वाचा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेच. पण कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंतही त्याचा खोलवर परिणाम होतो. त्यानुसार भारतीय हवामान विभागाने आज आपला जाहीर केलेला अंदाज महत्त्वाचा मानला जात आहे. यंदा 99 टक्के पाऊस होणार असल्याने सर्वांसाठीचं ही आनंदवार्ता आहे.