Maharashtra sugar production : यंदाच्या ऊस गाळप हंगामाची सांगता झाली आहे. यंदा राज्यात उसाचं विक्रमी गाळप झालं आहे. तसेच साखरेचं विक्रमी उत्पादन झालं असून, साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे.  महाराष्ट्राने 2021-22 मध्ये 137.28 लाख टन साखरेचे उत्पादन करुन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. मागील वर्षीच्या हंगामाच्या तुलनेत जवळपास 31 लाख टन साखरेचं अधिक उत्पादन केलं आहे. 


मोठ्या प्रमाणावर उसाच्या लागवडी झाल्या होत्या. त्यामुळं यंदाचा हंगाम खूप उशीरपर्यंत चालला. त्यामुळं यंदा उसाचे विक्रमी गाळप करण्यात आलं आहे. राज्यानं यावर्षी 1 हजार 320.31 लाख टन उसाचं गाळप करण्याचा विक्रम केला आहे. याबातची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. यावर्षी महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन इतके झाले आहे की उत्पादनाच्या बाबतीत ब्राझीलनंतप महाराष्ट्राचाच नंबर लागतो. 


उसाच्या सर्वाधिक उत्पादनानंतर यंदाचा महाराष्ट्राचा उसाचा गाळप हंगाम जास्त काळ चालला. 90 ते 120 दिवसांचा ऊस गाळप हंगाम यंदा राज्याच्या काही भागात 240 दिवसांवर गेला आहे. सरासरी गाळप हंगाम 173 दिवसांवर गेला. जो मागील वर्षी 140 दिवसांचा होता. दरम्यान, यंदा राज्यभरात सुमारे 200 साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केलं. दररोज 8 लाख टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्यांनी यावर्षी 1 हजार 320.31 लाख टन उसाचे गाळप केले. गेल्या वर्षी हा आकडा 1 हजार 13.64 लाख टन होता. त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कारखान्यांनी सुमारे 306.67 लाख टन अधिक उसाचे गाळप केल्याची आयुक्त गायकवाड म्हणाले.


राज्याचे यंदाचे क्षेत्रनिहाय साखरेचे उत्पादन बघितले तर सर्वात जास्त साखरेचं उत्पादन हे कोल्हापूर जिल्ह्यात झालं आहे. कोल्हापूरनंतर, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती आणि शेवटी नागपूरचा क्रमांक लागतो. यंदाच्या हंगामात सरासरी साखर उतारा हा 10.40 टक्के मिळाला आहे. यावर्षीचा गाळप हंगाम हा सरासरी 173 दिवस चालला. एफआरपीपोटी शेतकऱ्यांना 42 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. कारखान्यांनी यंदा इथेनॉलमध्ये 9 हजार कोटींची, सहविजेच सहा हजार कोटींची तर मद्यनिर्मितीतून 12 हजार कोटींची उलाढाल केली आहे. 


महत्वाच्या बातम्या: