Telangana Farmer Earns 2 Crore : प्रत्येक स्वयंपाक घरात हमखास आढळणारा आणि अन्नाची चव वाढवणाऱ्या टोमॅटोचे (Tomato) भाव सध्या गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना तर टोमॅटो परवडत नसल्याचं चित्र आहे. मात्र, याच टोमॅटोनं एका शेतकऱ्याचं नशीब बदललं आहे. टोमॅटो विकून एक शेतकरी चक्क करोडपती बनला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याची किंमत विविध ठिकाणी 100 ते 120 रुपये प्रतिकिलो आहे. याचाच फायदा या शेतकऱ्याला झाला आहे.
टोमॅटो विकून शेतकरी बनला करोडपती
तेलंगणातील मेडक जिल्ह्यात एका शेतकऱ्याने टोमॅटोचे पीक विकून गेल्या 15 दिवसांत सुमारे दोन कोटी रुपये कमावले आहेत. मेडक जिल्ह्यातील कौडीपल्ली मंडलातील मोहम्मद नगर गावातील बी महिपाल रेड्डी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. महिपाल रेड्डी आधी त्यांच्या 20 एकर शेतजमिनीवर भातशेती करायचे. पण, त्यानंतर त्यांनी टोमॅटोची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे जणू त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली आहे.
20 एकर शेतीमुळे 15 दिवसांत बदललं नशीब
पीटीआयला माहिती देताना शेतकरी महिपाल रेड्डी यांनी सांगितलं की, त्यांच्या शेतात एक कोटी रुपयांचे टोमॅटोचं पीक शिल्लक आहे. संततधार पावसामुळे पिकाचं नुकसान होणार असल्याने त्यांना पिकाची काळजी वाटत आहे. रेड्डी यांनी स्वतःची 20 एकर जमीन सोडून त्यांनी 80 एकर भाडेतत्त्वावर घेतली असून 60 एकरमध्ये भातशेती केली आहे आणि उर्वरित जमिनीवर ते इतर पिके घेतात.
भातशेतीत झालेल्या नुकसानीनंतर घेतला निर्णय
महिपाल रेड्डी यांमी माहिती देताना सांगितलं की, ते त्यांच्या 20 एकर शेतजमिनीवर आधी भातशेती करायचे. पण या भातशेतीत अनेकवेळा त्यांना नुकसान सहन करावं लागलं. यानंतर आठ वर्षांपूर्वी त्यांनी आठ एकरांवर भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या मनात टोमॅटोची शेती करण्याचा विचार आला. तेलंगणाच्या बाजारात सहसा शेजारच्या आंध्र प्रदेशातील मदनपल्ले आणि कर्नाटकातील कोलार येथून टोमॅटो येतात. त्यामुळे रेड्डी यांनी त्या ठिकाणांना भेटी देऊन त्यांच्या शेतीच्या शैली आणि तंत्रांचा अभ्यास केला आणि त्यानंतर टोमॅटोची शेती केली.
टोमॅटो विकून कोट्यवधीचं उत्पन्न
तेलंगणामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात जास्त तापमान असते. हे तापमान टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य नसते, त्यामुळे तापमान आणि हवामानाचा परिणाम नियंत्रित करण्यासाठी त्यांनी 16 लाख रुपये खर्चून आठ एकर टोमॅटो लागवड क्षेत्रात जाळी बसवली. शेड बांधले. यामुळे टोमॅटोचे उच्च उत्पादन आणि दर्जेदार उत्पादन आलं. 25 ते 28 किलो टोमॅटोच्या पेटीला 2500 ते 2700 रुपये भाव मिळाला. त्यांनी सुमारे 7,000 क्रेट सुमारे 2 कोटी रुपयांना विकले आहेत.
रेड्डी एप्रिलमध्ये टोमॅटोची पेरणी करतात आणि जूनच्या अखेरीस पीक काढणीसाठी तयार होते. ते शेतीमध्ये ठिबक सिंचन आणि स्टेकिंग पद्धती वापरतात. जर सर्व काही ठीक झाले तर ते आठवडाभरात त्यांचे सर्व टोमॅटो विकतील, असं रेड्डी यांनी सांगितलं आहे. रेड्डी यांचे टोमॅटो हैद्राबादच्या बोयनपल्ली, शाहपूर आणि पाटनचेरू मार्केट आणि त्याच्या बाहेरील भागात विकले आहेत.