Tanaji Sawant : शिंदे सरकार स्थापन होण्याआधीपासून रखडलेली परभणी (Parbhani) जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या उपस्थितीत पार पडली. ही बैठक अत्यंत वादळी ठरली. या बैठकीत पालकमंत्री डॉ. तानाजी सावंतांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. महावितरण आणि जिल्ह्यातील रस्त्याच्या तसेच स्मशानभूमीच्या विषयावरून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त स्मशानभूमी आणि महावितरणसाठी 18 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज तब्बल नऊ महिन्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताने छावणीचे स्वरुप आले होते. दिड तास चाललेल्या या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांची अनुपस्थिती होती. इतर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे लोकप्रतिनिधी मात्र या बैठकीला हजर होते. दरम्यान बैठक झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी बोलताना जिल्ह्यातील सर्व विषय मार्गी लागले असल्याचे सांगितले. तसेच पुण्यात त्यांच्या महाविद्यालयात झालेल्या तरुणीच्या आत्महत्येबाबत विचारले असता त्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये एकाने आत्महत्या केल्याचा प्रश्न विचारताच सावंतांनी न बोलता पळ काढला.
अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे नुकसान, पंचनाम्याचे आदेश
अतिवृष्टीमुळं परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याबाबत देखील सावंत यांना प्रश्न विचारण्यात आलं आहे. यावेळी ते म्हणाले की, याबाबत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदती दिली जाईल असेही सावंत यावेळी म्हणाले. परभणीजिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का? असा सवाल देखील सावंतांना यावेळी करण्यात आला. मात्र, तानाजी सावंत यांनी या प्रश्नाला बगल दिल्याचे पाहायला मिळालं. परतीचा पाऊस पाठ सोडायचं नाव घेत नसून परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि सेलू तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तर सोनपेठ गंगाखेड मानवत तालुक्यात पावसाची सुरु आहे. दरम्यान सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे पाथरी आणि सेलू तालुक्यातील सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: