Sugar Export Ban: सध्या साखरेच्या दरात (sugar price) वाढ होत आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. त्यामुळं साखरेच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी (2023-24) मध्ये सुरु होणाऱ्या ऊस गळीत हंगामाच्या पूर्वी सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घातण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


साखरेची मागणी वाढली


पावसाच्या कमतरतेमुळं साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे. तसेच सणासुदीच्या काळात साखरेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ही दोन्ही कारणं लक्षात घेता केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर काही निर्बंध घालण्याची शक्ता वर्तवली जात आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्यामुळे सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचे आदेश जारी करू शकते. साखरेच्या किमती वाढल्यानंतर सरकारने साखर कंपन्यांना 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत उत्पादन, डिस्पॅच, डीलर, किरकोळ विक्रेता आणि विक्रीचा संपूर्ण डेटा देण्याचे आदेश दिले होते. तसे न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील दिला होता. तसेच सरकारने साखर कारखान्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत NSWS पोर्टलवर नोंदणी करण्यास सांगितले आहे.


साखरेच्या दरात किती वाढ


सरकारी आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2023 रोजी साखर 41.45 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होती. ज्याची किंमत 10 ऑक्टोबर 2023 रोजी 43.84 रुपये प्रति किलो झाली आहे. म्हणजेच 2023 मध्ये, सरकारच्या आकडेवारीनुसार साखरेच्या दरात 6 टक्क्यांनी म्हणजेच सुमारे 2.50 रुपये प्रति किलो महाग झाली आहे. यापूर्वी साखरेचे दर वाढल्यानंतर सरकारने व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते आणि प्रक्रिया करणाऱ्यांना दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी दर आठवड्याला साखरेचा साठा जाहीर करणे बंधनकारक केले आहे. या व्यापाऱ्यांना प्रत्येक सोमवारी https://esugar.nic.in या पोर्टलला भेट देऊन त्यांच्या साखर साठ्याची माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाला द्यावी लागेल. दर आठवड्याला साखरेचा हा साठा जाहीर केल्यास साखरेच्या किमती नियंत्रित ठेवण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. साठेबाजी आणि अफवा रोखल्यास ग्राहकांना परवडणारी साखर उपलब्ध होण्यास मदत होईल. स्टॉकचे निरीक्षण करून, सरकारला बाजारातील कोणत्याही संभाव्य फेरफारविरुद्ध कारवाई करणे सोपे होईल.


महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस


यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटक या ऊस उत्पादक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. ऊसाच्या उत्पादनातही घट झाली असून, त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होणार आहे. त्यामुळं देशांतर्गत बाजारात साखरेचा तुटवडा भासू नये म्हणून सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र ही दोन राज्य साखर उत्पादनात आघाडीवर आहेत. 


आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किंमती गेल्या 13 वर्षातील सर्वोच्च


आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात सातत्यानं वाढ (sugar prices rising) होत आहे. त्यामुळं जागतिक स्तरावर अन्नधान्याची महागाई वाढण्याचा धोका अधिक तीव्र झाला आहे. सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र, महागाईमुळे लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे. विशेषत: खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळं लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, साखरेच्या किंमतीत वाढ झाल्यामुळं अन्न पदार्थांच्या किंमतीत वाढ होत आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किंमती गेल्या 13 वर्षातील सर्वोच्च आहेत. त्यामुळं देशांतर्गत बाजारावरही दबाव येत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Sugar Prices : सणासुदीचा काळ, साखरेनं काढला जाळ; गेल्या 13 वर्षांतील सर्वोच्च दर