Latur Rain : मागच्या चार दिवसापासून लातूर (Latur) जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नुकतीच पेरणी झालेल्या खरीप पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी पडझड किंवा दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळं लातूर जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी. तसेच पाणी साचलेल्या भागात पाहणी करुन नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत अशा सूचना माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. तसेच 
गोगलगायच्या प्रादुर्भावामुळं सोयाबीनच्या पिकाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत  माहिती घेऊन त्याचे पंचनामे करावेत अशी सूचनाही देशमुख यांनी केली आहे. 


लातूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसापासून सूर्यदर्शन झालेले नाही. सातत्यानं संतंतधार पाऊस सुरु आहे. कालपासून पावसाचा जोर आणखीन वाढला आहे. या परिस्थितीत पडझडीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सखल भागात पाणी साचून खरीप पिकाचेही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर  अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्याशी  जिल्ह्यातील सद्य परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यांच्याकडून आढावा घेतला, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून राहण्याची सूचना केली. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही याप्रसंगी  केल्या आहेत. सद्या पडणारा पाऊस जोराचा नसला तरी काल दिवसभरात काही ठिकाणी 39 ते 80 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळं नदी-नाले  प्रवाही झाले आहेत. पाऊस असाच चालू राहिला तर पूर परिस्थिती उद्भवू शकते ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कोणतेही धरण भरलेले नसल्यामुळं तेथून विसर्ग करण्यासारखी परिस्थिती नाही. खरीप पिकाचे अद्याप नुकसान झाले नसले तरी महसूल यंत्रणेने याबाबत आवश्यकतेनुसार पंचनामे करुन माहिती जमा करावी अशा सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहावं


गोगलगायच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या पिकाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत  माहिती घेऊन त्याचे पंचनामे करावेत अशी सूचनाही अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. कृषी विभागाकडून यासंदर्भात माहिती मागवण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्क करावे, बॅरेजमध्ये पाणी थांबून शेत जमिनींचे नुकसान होणार नाही यासाठी पाटबंधारे विभागाला सतर्क राहण्यास सांगावे आदी सूचनाही  जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. याबाबत सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


पुढचे दोन दिवस पावसाचे


हवामान खात्याचा अंदाजानुसार आणखी एक दोन दिवस पावसाचे आहेत. त्यामुळं लातूर जिल्ह्यातील सर्वच नदी पात्रात वाढत असलेली पाण्याची पातळी लक्षात घेता नदीकाठच्या लोकांनी सावध राहावं. आपले पशुधन व अवजारे सुरक्षित स्थळी हलवावीत, कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता सर्वांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन अमित देशमुख यांनी नागरिकांना केले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: