Sharad Pawar on Organic Farming : सेंद्रीय शेती उत्पादनांचे महत्त्व जगभरात वाढत आहे. त्यामुळं सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादन व मार्केटिंग बाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्य सरकार आणि केंद्र सरकार बरोबर बैठक घेणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. सेंद्रीय शेतीला गती देण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचं त्यांनी सांगितलं.


कन्हेरी येथे महा ऑरगॅनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन अर्थात मोर्फा च्या राज्यस्तरीय संचालक व जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीत पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मोर्फाचे तज्ञ संचालक युगेंद्र पवार, अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातील सेंद्रीय शेतीच्या अडचणी व मार्केटिंगसाठी शासनाची मदत कशी आवश्यक असल्याचे अंकुश पडवळे म्हणाले. 




राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात काही वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने घेतली जातात. तसेच ज्या फळपिकांना राज्यात जीआय मानांकन मिळाले आहे, अशा पिकांवर लक्ष देऊन त्या फळपिकांतील सेंद्रीय उत्पादनाबाबत आपण मोर्फाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन प्रयत्न करावा असेही पवार म्हणाले. सेंद्रीय शेतीमध्ये मातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळं सर्वांनी जमीनीचे आरोग्य व जमीनीचा सेंद्रीय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न केले तरच सेंद्रिय शेती सोपी होऊ शकते. त्यामुळं यापुढे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोर्फाने सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शकाची भुमिका वठवावी असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.




जगभरात आरोग्याच्या दृष्टीनं कमालीची जागृकता आली आहे. त्यामुळं सेंद्रिय शेती उत्पादनांना भविष्यात मोठी मागणी वाढणार आहे.  त्यादृष्टीनं राज्यातील शेतकऱ्यांनी सावध पावलं उचलून सेंद्रीय शेती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सेंद्रिय शेतीच्या असलेल्या आपल्या अडचणीबाबत मी स्वतः मोर्फा पदाधिकाऱ्यांसमवेत राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.


आज बारामतीतील कन्हेरी येथे मोर्फाची राज्यस्तरीय बैठक आयोजीत केली होती. यावेळी राज्यभरातील विविध ठिकाणाहून मोर्फाचे संचालक आले होते. या सर्व संचालकांनी त्यांच्या त्यांचा भागातील माहिती शरद पवार यांना दिली. त्यानंतर शरद पवार यांनीही त्यांना मार्गदर्शन केले. तसेच सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणं त्यांच्या उत्पादन व मार्केटिंग बाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार बरोबर बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: