Narendra Singh Tomar : लहान शेतकर्‍यांना सक्षम बनवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे ध्येय असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी व्यक्त केले. भारतातील सुमारे 55 टक्के लोकसंख्या ग्रामीण आहे आणि जेव्हा ग्रामीण लोकसंख्येचा विकास होईल तेव्हाच देशाची प्रगती होईल, असेही ते म्हणाले. केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्या उपस्थितीत जागतिक मधमाशी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.




महाराष्ट्रासह 5 राज्यांमधील 7 मधचाचणी प्रयोगशाळा


देशात 'मधुर क्रांती' घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सरकार अत्यंत गांभीर्याने काम करत असल्याचे नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. यानिमित्ताने केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत टेंट सिटी-2, एकता नगर, नर्मदा, गुजरात येथे राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तोमर यांनी महाराष्ट्रातील पुणे, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा, बांदीपुरा आणि जम्मू, कर्नाटकातील तुमकूर, उत्तर प्रदेशातील सहारनपूर आणि उत्तराखंड येथील मधचाचणी प्रयोगशाळा आणि प्रक्रिया एककांचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, लहान शेतकर्‍यांना सक्षम बनवणे हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. जेव्हा ग्रामीण लोकसंख्येचा विकास होईल तेव्हाच देशाची प्रगती होईल, असे ते यावेळी म्हणाले.


देशात 1 लाख 25 हजार मेट्रिक टनांहून अधिक मधाचे उत्पादन


राष्ट्रीय मधमाशीपालन आणि मध अभियान या केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यातून साकार झालेल्या योजनेत 5 मोठ्या प्रादेशिक आणि 100 लहान मध आणि इतर मधमाशी उत्पादन चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 3 जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. तर 25 लहान प्रयोगशाळा स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. भारत सरकार प्रक्रिया एककांच्या स्थापनेसाठी देखील मदत करत आहे. देशात 1 लाख 25 हजार मेट्रिक टनांहून अधिक मधाचे उत्पादन होत आहे.  त्यापैकी 60 हजार मेट्रिक टनांहून अधिक नैसर्गिक मधाची निर्यात केली जाते. जागतिक बाजारपेठेला आकृष्ट करण्यासाठी देशांतर्गत मध उत्पादनात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने, भारत सरकार आणि राज्य सरकारे एकत्रितरित्या सुनियोजित प्रयत्न करत आहेत. तसेच वैज्ञानिक तंत्रांचा अवलंब करुन मध उत्पादनासाठी मधमाशीपालकांची क्षमता वाढवण्यावर भर देत असल्याचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.