Onion News : काढणी पश्चात कांद्याचे (Onion) नुकसान कमी करण्यासाठी, 'ग्रँड ओनियन चॅलेंज' मध्ये सहभागी होण्याचे आवाहन ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी केले. तरुण व्यावसायिकांसाठी 'ग्रँड ओनियन चॅलेंज' खुले आहे. उच्च शैक्षणिक संस्था, व्यावसायिक आणि संशोधन संस्थांना देखील सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे ग्रँड ओनियन चॅलेंज (Grand Onion Challenge) 15 ऑक्टोबर पर्यंत खुले असणार आहे. 


या चॅलेंजच्या माध्यमातून देशात कांद्याचे  काढणी पूर्व तंत्र , प्राथमिक प्रक्रिया, साठवणूक आणि काढणीनंतर कांद्याची वाहतूक यात सुधारणा करण्यासाठी,  उत्पादन रचना आणि मूळ नमुना याचा अभ्यास असलेल्या  तरुण व्यावसायिक, प्राध्यापक, वैज्ञानिकांकडून कल्पना  मागवण्यात येत आहेत. निर्जलीकरण, कांद्याचे मूल्यस्थापन आणि कांदा प्रक्रिया क्षेत्रात तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करण्याच्या कल्पनाही  या चॅलेंजच्या माध्यमातून  मागवण्यात येत आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट बुद्धिमान लोकांकडून  वर नमूद  केलेल्या सर्व क्षेत्रामधील  कल्पना प्राप्त करण्यासाठी  ग्राहक व्यवहार विभागाद्वारे 20 जुलै 2022 रोजी सुरु करण्यात आलेले ग्रँड ओनियन चॅलेंज 15 ऑक्टोबर पर्यंत खुले आहे. या चॅलेंजबाबत अधिक माहिती विभागाच्या doca.gov.in/goi या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे.


ग्रँड ओनियन चॅलेंजच्या नोंदणी वेबपृष्ठावर आतापर्यंत 122 नोंदणी प्राप्त झाल्या आहेत. काही सहभागींनी त्यांच्या कल्पना सादर केल्या आहेत. विभागाकडून  चार श्रेणीमध्ये  40 चांगल्या कल्पना निवडल्या जातील. या कल्पनांमधून  सुधारणा आणि तंत्रज्ञान नवकल्पना शोधल्या जातील. म्हणूनच कांद्याचे  काढणीपूर्व, प्राथमिक प्रक्रियेतील , साठवणूक आणि वाहतूक यातील नुकसान टाळण्यासाठी  किफायतशीर उपाय विकसित करण्याच्या दृष्टीने  आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत उपक्रमाला  पाठबळ देण्यात येईल. या अनुषंगाने देशातील संबंधित विभाग आणि संस्थांना कल्पना सादर करण्याचे आवाहन केले जात आहे.


दरम्यान, विविध संस्था, विद्यापीठातील संशोधक आणि प्राध्यापकांनी कांद्याची साठवणूक आणि वाहतूक करताना होणारे नुकसान कमी करण्यासाठी अनेक अनोख्या कल्पना मांडल्या आहेत. देशभरातून विविध संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि खाजगी क्षेत्रातील स्टार्टअप्समधील 282 हून अधिक सहभागींनी यामध्ये सहभाग घेतला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: