Tomato Import: टोमॅटोच्या (Tomato Rates) वाढलेल्या दरांनी सर्वसामान्यांना पुरतं हैराण करुन सोडलं आहे. संपूर्ण देशभरात टोमॅटोचे दर वधारल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच या अटीतटीच्या परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी शेजारील देश नेपाळ धावून आला आहे. नेपाळनं भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नेपाळमधून मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची आयात केली जात आहे. परंतु, शेजारील देश नेपाळनं भारताकडून अत्यावश्यक वस्तूंसोबतच तांदळाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. किंबहुना, देशांतर्गत बाजारपेठेतील किमती रोखण्यासाठी नुकतंच भारत सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मोदी सरकारनं उचललेल्या या पावलामुळे अनेक देशांमध्ये खळबळ माजली होती. मात्र, नेपाळच्या मागणीवर सरकारनं काय निर्णय घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 


पीटीआयशी बोलताना नेपाळच्या कृषी मंत्रालयाच्या प्रवक्त्या शबनम शिवकोटी म्हणाल्या की, "नेपाळ टोमॅटो भारतात पाठवण्यास तयार आहे. त्या बदल्यात, भारत सरकारला हे सर्व टोमॅटो बाजारपेठेत सहजरित्या पोहोचवावे लागतील आणि काही जीवनावश्यक वस्तू पाठवाव्या लागतील. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळनं सरकारला पत्र लिहून टोमॅटोऐवजी तांदूळ आणि साखर निर्यात करण्याचं आवाहन भारत सरकारला केलं आहे.


नेपाळमधून येणारे टोमॅटो देशातील बाजारपेठेत पाठवले जातील, जेणेकरून टोमॅटोच्या वाढलेल्या किमती नियंत्रित ठेवता येतील, अशी माहिती मिळत आहे. जास्तीत जास्त टोमॅटो उत्तर प्रदेशात पाठवले जातील. नेपाळमधील काठमांडू, ललितपूर आणि भक्तपूरमध्ये टोमॅटोचे सर्वाधिक पीक घेतल्याची माहिती आहे. येथून टोमॅटोचा अवैध व्यापार भारतात सुरू आहे. मात्र आता सरकारनं ते स्वत:च्या हातात घेतलं आहे.


गेल्या एक-दोन महिन्यांपासून भारतात टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याची माहिती आहे. काही ठिकाणी टोमॅटो 200 रुपये, काही ठिकाणी 250 रुपये तर काही ठिकाणी 300 रुपये किलोनं विकलं जात होतं. मात्र, केंद्र सरकारनं नुकतंच अनुदानावर टोमॅटोची विक्री सुरू केली होती, त्यामुळे टोमॅटोचे भाव काही प्रमाणात आटोक्यात आले आहेत. आता दर 50 रुपये किलोपर्यंत खाली आला आहे.


घाऊक बाजारात दर घटल्याने टोमॅटो स्वस्त


केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेडला (NAFED) टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याच्या सूचना दिल्या आहेत. अलीकडच्या काळात घाऊक बाजारात टोमॅटोच्या किमतीत घट झाली असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितलं आणि त्यामुळे टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


इतर राज्यांत टोमॅटोची स्वस्त दरात विक्री सुरू


मंत्रालयाने सांगितलं की, 14 जुलै 2023 पासून दिल्ली-एनसीआरमध्ये स्वस्त दरात टोमॅटोची विक्री सुरू झाली आहे. 13 ऑगस्ट 2023 पर्यंत नाफेड आणि NCCFने किरकोळ बाजारात 15 लाख किलो टोमॅटोची खरेदी आणि विक्री केली आहे. दिल्ली एनसीआर व्यतिरिक्त राजस्थानमधील जोधपूर कोटा, उत्तर प्रदेशातील लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि बिहारमधील पटना, मुझफ्फरपूर, आराह, बक्सरमध्ये टोमॅटो स्वस्त दरात विकले गेले आहेत.