Pandharpur NCP Latest News : ऊसाचे बिल मागणाऱ्या शेतकयाला भर सभेतच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी पंढरपूर येथे घडला. पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आज सत्ताधारी  भालके गटाची  विचार विनिमय बैठक बोलावली होती.  या बैठकीत रोपळे येथील शेतकरी सभासद जगन भोसले यांनी थकीत ऊस बिलाची मागणी करताच उपस्थित पदाधिकार्यांनी संबंधित शेतकऱ्याला शिवीगाळ करत व्यासपीठावरच नेत्या समोर मारहाण केली. यामुळे सभेत राडा झाला.


श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक उपस्थित होते. प्रमुख नेत्यांसमोरच शेतकर्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की  झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी रोपळे येथील शेतकरी जगन भोसले यांनी माईक वर येऊन आपण अनेक वेळा चेअरमन भगीरथ भालके , राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्याकडे उसाचे बिल द्यावे अशी मागणी केली होती. मात्र अद्यापपर्यंत मला उसाचे बिल मिळाले नाही तर अनेक भाषणं केली पण याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. अशी व्यथा त्याने मांडली असता,  चिडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या  कार्यकर्त्यांनी जगन भोसले याला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.


आपले ऊस बिल वाहतूक आणि उसाची बिले अडकली असून आपल्या नावावर १८ लाखांचे बोगस कर्ज घेतल्याचा खळबळजनक दावा या जगन भोसले या शेतकऱ्याने केला आहे . वास्तविक गेल्या दोन वर्षांपासून विठ्ठल कारखाना बंद असून शेतकऱ्यांच्या उसाची बिले , कामगारांचे पगार आणि तोडणी वाहतूकदारांच्या कोट्यवधींची बिले थकीत असल्याने शेतकरी , कामगार वर्गात मोठा असंतोष आहे . आज भालके यांच्या बैठकीत येऊन जगन भोसले या शेतकऱ्याने आमचे पैसे द्या अशी मागणी केल्यावर हा राडा झाला . दरम्यान आपण या सभासदाला त्याची अडचण मांडण्यास परवानगी दिली मात्र काही राजकीय हेतूने त्याने हा गोंधळ घातल्याचा दावा कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी केला आहे . ज्या लोकांचे पैसे थकीत आहेत त्याबाबत मी काय भूमिका मांडतोय हे ऐकण्यापूर्वीच या शेतकऱ्याने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे भालके यांनी सांगितले . 


आज कारखान्याच्या  प्रमुख लोकां समोरच राडा झाल्याने काही काळ वातावरण तणावग्रस्त झाले होते. उद्यापासून कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. आता होऊ घातलेल्या विठ्ठल कारखाना निवडणूकीत थकीत ऊस बिल प्रश्न मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.