Nandurbar Cotton : यंदा राज्यात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं शेतकरी समाधानी आहेत. चांगला पाऊस झाल्यामुळं पिकांच्या लागवडीत देखील वाढ झाली आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात यावर्षी कापसाच्या (Cotton) लागवडीत मोठी वाढ झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यात आत्तापर्यंत एक लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कृषी विभागानं (Department of Agriculture) दिली आहे.


उत्तर महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून कापसाची लागवड


राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते.  राज्यातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा भाग म्हणून उत्तर महाराष्ट्राची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली जाते. यावर्षी नंदूरबार जिल्ह्यात एक लाख आठ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, मागील वर्षी कापसाला मिळालेला चांगला दर आणि इतर बाबींचा विचार केला असता यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात कापसाच्या लागवडीत उद्दीष्टापेक्षा जास्त लागवड झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 16 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली असून कापूस लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. 


कापसासोबतच तांदळाचे क्षेत्र देखील वाढण्याचा अंदाज कृषी विभागाचा अंदाज 


यावर्षीच्या खरीप हंगामात नंदूरबार जिल्ह्यात दोन लाख 95 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात एक लाख 16 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. तर दुसरीकडं समाधानकारक पावसामुळं जिल्ह्यात 85 टक्के पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यावर्षी कापसासोबतच तांदळाचे क्षेत्र देखील वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.


काही भागात अतिवृष्टीनं नुकसान, मदत राज्य सरकारकडून जाहीर


विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीनं पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांबरोबरच घराचं, शेतजमीनींचं नुकसान झाले आहे. आतापर्यंत राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.  शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपये मदतीची घोषणा केली आहे. तसेच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती 3 हेक्टर केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: